सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण शहरातील सोमवार पेठेत नेटके कुटुंब भयभीत; वारंवार त्रासामुळे कुटुंब दहशतीत

On: October 3, 2026 6:39 AM
Follow Us:

भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासही धजावत नसल्याची माहिती; प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज

फलटण : फलटण शहरातील सोमवार पेठ परिसरात अनुसूचित जातीतील मातंग समाजातील ताराबाई नेटके यांच्या कुटुंबाला काही व्यक्तींकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रात्री-अपरात्री घराजवळ येऊन त्रास देणे, कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणे तसेच मारहाणीचे प्रकार घडत असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे कुटुंबातील महिला, वयोवृद्ध, पुरुष तसेच किशोरवयीन सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नेटके कुटुंब एकटे असल्याचा गैरफायदा घेत काही व्यक्ती व हुल्लडबाज तरुणांकडून त्रास दिला जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या कथित त्रासामुळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यासही कुटुंबीय घाबरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुटुंबीयांच्या मनात निर्माण झालेली भीती लक्षात घेता, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे. कुटुंबाला नेमका कोणाकडून, कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या प्रकारे त्रास दिला जात आहे, याची वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरज आहे.

या प्रकारामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, खैरलांजीसारख्या भयंकर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे, फलटण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अभिजीत जाधव तसेच सातारा जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नेटके कुटुंबाशी संपर्क साधावा, त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाय योजनेची आवश्यकता आहे.

कुटुंबीयांच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाला कोणतीही भीती न बाळगता आपली बाजू मांडता यावी, यासाठी प्रशासनाने विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. नेटके कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!