सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

हरित फलटणासाठी पंचायत समितीचा पुढाकार; सभापती कु. शिवांजली भोसले यांची संकल्पना

On: May 16, 2026 10:23 AM
Follow Us:

फलटण : पंचायत समिती फलटणच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी “हरित फलटण संकल्प अभियान २०२६” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सभापती कु. शिवांजली भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात येणार असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षनिर्मिती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पंचायत समिती फलटणची मासिक सभा मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पंचायत समितीच्या सभागृहात सभापती कु. शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, घरकुल, शेती, पशुसंवर्धन, एमएसआरएलएम, समाजकल्याण, ग्रामपंचायत विभाग, मनरेगा आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि वाढते तापमान लक्षात घेता “हरित फलटण संकल्प अभियान २०२६” सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानांतर्गत मे व जून महिन्यात करंज, चिंच, आवळा, उंबर, कडूलिंब, कवठ, बेल, भोकर, गुलमोहर आदी स्थानिक वृक्षांच्या बियांचे तालुकास्तरावर संकलन करण्यात येणार आहे. पंचायत समिती येथे बीजकुंभ उभारून बियाणे जमा करण्यात येणार असून शेतकरी, नागरिक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

संकलित करण्यात आलेल्या बिया समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात डोंगराळ, माळरान आणि पठारी भागात पेरण्यात येणार आहेत. यामुळे नैसर्गिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षनिर्मिती होऊन पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार असल्याचे सभेत सांगण्यात आले.

हा उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवेगार व समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सभापती कु. शिवांजली भोसले यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम, पाणी तपासणी, मुला-मुलींच्या जन्मदरातील तफावत कमी करण्यासाठीचे उपाय, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. तसेच २५ वर्षांहून जुनी शाळा इमारतींची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) विभागांनी उद्दिष्टांपेक्षा अधिक कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सभेचे कामकाज सभापती कु. शिवांजली भोसले, पंचायत समिती सदस्य-सदस्या तसेच सचिव तथा गट विकास अधिकारी श्री. प्रकाशकुमार बोंबले यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!