फलटण : फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याने आधुनिक व पुरोगामी विचार जोपासत शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देऊन लोकविकासाचे धोरण नेहमीच राबवले. ब्रिटिश काळात कोल्हापूर, सातारा, बडोदा आणि फलटण या संस्थानांनी स्वकीय संस्कार, प्रथा, परंपरा, संस्कृती आणि लोकभावना जपत प्रगतीचा मार्ग स्वीकारला होता, असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. सातारा इतिहास संशोधन मंडळ आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ या विषयावर आयोजित १७ व्या वार्षिक अधिवेशन व एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अवनीश पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण संस्थानात १८८३ मध्ये मुधोजीराजे यांनी शिक्षणाचा पाया घातला. कोल्हापूर, सातारा, बडोदा आणि फलटण संस्थानांच्या इतिहासाचा अभ्यास समकालीन कागदपत्रांच्या आधारे करता येतो. राजर्षी शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज, श्रीमंत मालोजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानांमध्ये शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन, सहकार आणि आधुनिकतेला प्रोत्साहन दिले. या परिवर्तनातून कर्मवीर भाऊराव पाटील आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या शिक्षणमहर्षींनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आधुनिक शेती, पाणीपुरवठा, पाटबंधारे, कालवे, धरणे, लघुउद्योग, व्यावसायिक शिक्षण, स्त्रीशिक्षण, लोकशाही मूल्ये आणि अस्पृश्यता निवारण या क्षेत्रांतील योगदानाचा अभ्यास करून पुढील पिढीपर्यंत विकासाचा ऐतिहासिक वारसा पोहोचविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अवनीश पाटील यांनी कोल्हापूर, सातारा आणि फलटण ही संस्थाने सामाजिक व राजकीयदृष्ट्या पुरोगामी आणि मानवतावादी विचारांची होती, असे सांगितले. फलटण संस्थानात आधुनिक शिक्षण आणि पुरोगामी विचार रुजविण्याची क्षमता होती. या विचारांचा तत्कालीन समाजावर झालेला परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. सत्यशोधक पालेकर यांनी १९४३ मध्ये फलटण संस्थानाच्या प्रगतीचा तुलनात्मक आढावा मांडला होता. ब्रिटिश काळात या संस्थानांनी स्वतंत्र ओळख जपत आधुनिक लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. डॉ. विजयराव नलवडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. डॉ. जयपाल सावंत, प्रा. डॉ. संतोष कदम, प्रा. डॉ. तुकाराम शिंदे आणि डॉ. अनिक रिशे उपस्थित होते.
या राष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी भोजनाचा खर्च प्रायोजित केला. तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र कोरे यांनी २५ हजार रुपये, प्रा. डॉ. संतोष कदम यांनी ११ हजार रुपये, तर प्रताप गावडे, मनोज कदम, कौशल्या रणदिवे, संदीप रिशे आणि माळवदे मॅडम यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी दिली. या सर्व देणगीदारांचा तसेच मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक या परिषदेला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले, तर आभार प्रा. अभिजित कदम यांनी मानले.
फलटण संस्थानाने नेहमीच पुरोगामी आणि विकासाभिमुख धोरण अवलंबले : श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर
By Team LBNN
On: October 18, 2026 4:03 PM











