सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आम्ही दोघं भाऊ-भाऊ मिळून सारं खाऊ यापेक्षाचं दोन्ही नाईक निंबाळकरांनी फलटणच्या विकासासाठी झटावं! अन्यथा आगामी काळात जनता तिसरा पर्याय शोधेल!

On: August 23, 2026 5:43 PM
Follow Us:

फलटण : गेल्या अनेक वर्षांपासून फलटणच्या राजकारणात नाईक निंबाळकर घराण्याचीच प्रमुख भूमिका राहिली आहे. सत्तेच्या बाजूला एक नाईक निंबाळकर आणि विरोधात दुसरे नाईक निंबाळकर, असे राजकीय समीकरण फलटणकरांनी अनेक वर्षे पाहिले आहे. या दोन्ही प्रमुख राजकीय प्रवाहांव्यतिरिक्त गेल्या ३० वर्षांत इतर कोणत्याही राजकीय व्यक्तीला किंवा घराण्याला तितकी प्रभावी राजकीय लढत उभी करता आलेली नाही, हेही वास्तव आहे.

अशा परिस्थितीत दोन्ही नाईक निंबाळकरांनी मनोमिलन करून फलटणच्या विकासासाठी एकत्र काम करावे, अशी काही नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, लोकशाहीत राजकीय मतभेद आणि सत्तासंघर्ष असले तरी त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ नये, अशीच सर्वसामान्यांची भूमिका असल्याचे चित्र आहे.

“आम्ही दोघं भाऊ-भाऊ मिळून सारं खाऊ” अशी भावना जनतेमध्ये निर्माण होण्यापेक्षा दोन्ही नाईक निंबाळकरांनी आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून फलटणच्या विकासासाठी झटावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

फलटण तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षांत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक भागांना त्याचा फायदा झाला आहे. फलटणचा बहुतांश भाग सिंचनाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी विविध पाणी योजनांवर काम झाले आहे. फलटण मध्ये एमआयडीसी आणत त्यामध्ये कमिन्स सारखा मोठा उद्योग आणला गेला.

त्याचबरोबर फलटणला आधुनिक शहराच्या दिशेने नेण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडूनही विविध विकासकामांसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही नाईक निंबाळकरांनी आपापल्या राजकीय भूमिका कायम ठेवत असतानाच फलटणच्या विकासासाठी सकारात्मक स्पर्धा करावी, अशी अपेक्षा आहे.

आजची फलटणची जनता पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आणि राजकीयदृष्ट्या सजग आहे. त्यामुळे राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजहित आणि विकासासाठी असावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.

दोन्ही नाईक निंबाळकरांनी एकमेकांशी राजकीय संघर्ष करताना तो संघर्ष विकासाच्या स्पर्धेत बदलला, तर त्याचा सर्वाधिक फायदा फलटणला होईल. “तुमचं काम मोठं की आमचं?” अशी विकासाची स्पर्धा लागली, तर फलटण निश्चितच पुढे जाईल.

मात्र, राजकीय संघर्ष केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिला आणि विकासाचा मुद्दा मागे पडला, तर जनता पर्याय शोधण्यास मागेपुढे पाहणार नाही. गेल्या ३० वर्षांपासून दोन प्रमुख राजकीय प्रवाहांभोवती फिरणाऱ्या फलटणच्या राजकारणात आगामी काळात जनता तिसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेऊ शकते, ही शक्यताही दोन्ही नाईक निंबाळकरांनी नजरेआड करू नये.

राजकारणात सत्ता येते-जाते, त्यामुळे फलटणच्या राजकारणातील दोन्ही प्रमुख नाईक निंबाळकरांनी जनभावना लक्षात घेऊन परस्परांच्या राजकीय संघर्षाला विकासाच्या सकारात्मक स्पर्धेत रूपांतरित करावे आणि फलटणला सातारा जिल्ह्यात विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जावे, हीच सर्वसामान्य फलटणकरांची अपेक्षा आहे.

– सागर चव्हाण
संपादक, लोकशाही भारत न्यूज

हे ही वाचा  “आद्य दीपोत्सव – लोकशाही भारत दिवाळी विशेषांक २०२५”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!