आमदार सचिन पाटील यांच्या आदेशालाच हरताळ?
फलटण : फलटण शहरातील शासकीय रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाकडूनच केसपेपर देण्याचे काम करून घेतले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी वारंवार सुरक्षेच्या तक्रारी समोर आल्याने, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार सचिन पाटील यांच्या आदेशानुसार सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र, रुग्णालयातील केसपेपर देण्याचे काम करणारा कर्मचारी अनुपस्थित असल्याने सुरक्षारक्षकाकडूनच केसपेपर देण्याचे काम करून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकाचे मूळ कर्तव्य असलेल्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रुग्णालयात एखादी अनुचित घटना घडल्यास सुरक्षारक्षकाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे अपेक्षित असते. मात्र त्याच वेळी तो केसपेपर देण्याच्या कामात व्यस्त असेल, तर सुरक्षा व्यवस्था कोण पाहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरक्षारक्षकाची नियुक्ती नेमकी सुरक्षा करण्यासाठी झाली आहे की केसपेपर देण्यासाठी? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होत असून, संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने स्पष्टता देण्याची गरज आहे.






