सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव १७ व १८ एप्रिलला

On: April 10, 2026 5:30 PM
Follow Us:
---Advertisement---


फलटण – शास्त्रीय संगीत ही भारताची जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. मात्र, कालांतराने योग्य प्रचार-प्रसार न झाल्याने पारंपरिक संगीत आणि नव्या पिढीमध्ये दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते.
ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटणच्या राजघराण्याने साहित्य, क्रीडा आणि कला यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच फलटण परिसरात आजही व्यासंगी आणि दर्दी रसिकांची परंपरा टिकून आहे.
फलटण शहर आणि परिसर सध्या शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना, समाजातील सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कारमूल्यांचे जतन करणे आवश्यक ठरत आहे. या उद्देशाने अधिकाधिक लोकांपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचविण्यासाठी कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांनी २०२० पासून “फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव” हा उपक्रम सुरू केला. यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतिशील टीमचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे.
हळूहळू हा महोत्सव फलटण शहराची सांस्कृतिक ओळख बनत आहे. या महोत्सवात आतापर्यंत सावनी शेंडे, पौर्णिमा धुमाळे, प्रमोद मराठे, अमर ओक आणि श्रुती भावे यांसारख्या ख्यातनाम कलाकारांनी सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत.
परंपरेतील संगीत नव्या पिढीसाठी सुलभ आणि आकर्षक पद्धतीने सादर केले जात असून रसिकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राग-तालांची अनुभूती घेण्यासाठी फलटणकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
यावर्षीचा महोत्सव १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६ ते ९ या वेळेत, प्रतिवर्षाप्रमाणे मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा “जादूची पेटी” हा विशेष कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू सादर करणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सनई वादक केदार जाधव यांचेही सादरीकरण होणार आहे.
याशिवाय, प्रतिभावान युवा कलाकार रसिका वैशंपायन, रियालिटी शोमधून नाव कमावलेली प्रियांका चौधरी-ढेरंगे यांचे गायन आणि निवेदिता-नंदिता देशपांडे यांचे कथक नृत्य हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स मुख्य प्रायोजक असलेल्या या महोत्सवाला जोशी हॉस्पिटल्स, अग्रोकेम फाउंडेशन, आय. आय. केअर फाउंडेशन, मैग्निशिया केमिकल्स, अरिस्टा केमिकल्स, अरिहंत ऑटोझोन, युनिटी डेव्हलपर्स आणि शांतीकाका सराफ अँड सन्स यांचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमासाठी “खुर्ची प्रवेशिका” जोशी हॉस्पिटल्स, अरिहंत ऑटोझोन (TVS शोरूम), शांतीकाका सराफ (रिंग रोड) आणि सरस्वती संगीत अकादमी येथे उपलब्ध आहेत.
कार्यक्रम दररोज सायंकाळी नेमक्या ६ वाजता सुरू होणार असल्याने रसिकांनी वेळेचे भान ठेवावे.
फलटणकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाग्यश्री गोसावी, प्रा. अरविंद निकम, श्री प्रमोद निंबाळकर, प्राचार्य वसंत शेडगे आदींनी आयोजकांच्या वतीने केले आहे.

हे ही वाचा  सातारा जिल्हा प्रशासन जनगणना २०२७ साठी सज्ज; डिजिटल पद्धतीने होणार माहिती संकलन – जिल्हाधिकारी संतोष पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!