फलटण : उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी उष्मालाटेपासून बचाव करण्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलके व सुती कपडे वापरणे, तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, उन्हात काम करताना डोके झाकणे, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवणे, ORS, लिंबूपाणी, ताक, पन्हे यांसारख्या द्रव पदार्थांचा वापर करणे आवश्यक आहे. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. दारू, चहा, कॉफी व थंड पेये टाळावीत तसेच जड व शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी व गरोदर महिला तसेच आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







