फलटण – फलटण येथील निरा उजवा कालव्यात (कॅनॉल) घडलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. इनोव्हा चारचाकी वाहनाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ते वेगाने वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये कोसळले. या घटनेत वाहनातील पती-पत्नी बुडण्याच्या स्थितीत असताना, गोविंद बोडरे या धाडसी युवकाने तत्परता दाखवत दोघांचे प्राण वाचवले.
घटनेच्या वेळी गोविंद बोडरे हे स्वतः कॅनॉलमध्ये पोहत होते. अचानक झालेल्या अपघातात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली आणि जीव धोक्यात घालून दोघांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कृत्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या शौर्याबद्दल फलटण आरटीओ कार्यालयाच्या वतीने गोविंद बोडरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा श्री. दशरथ वाघुले यांच्या आदेशानुसार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण श्री. संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. अमित रोकडे, मोटार वाहन निरीक्षक श्री. नदाफ, श्री. योगेश मोरे, तसेच कनिष्ठ लिपिक श्री. सागर साळुंखे व श्री. करण ठोंबरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. उमाकांत दीक्षित आणि श्री. सनी पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या दाम्पत्याला जीवदान; गोविंद बोडरे यांचा फलटण आरटीओकडून सन्मान
By Team LBNN
On: May 5, 2026 10:11 AM











