सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकप्रतिनिधींकडून घटनात्मक व प्रशासकीय मर्यादांचे घोर उल्लंघन – महेंद्र सूर्यवंशी बेडके

On: August 7, 2026 8:45 AM
Follow Us:

फलटण : काल फलटणमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासकीय शिष्टाचाराला काळीमा फासणारा आहे. फलटणचे आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ते थेट ‘तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, फलटण’ यांच्या अधिकृत खुर्चीवर स्थानापन्न झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

इंटरनेट आणि केबल सेवा प्रदात्यांसंदर्भात प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे, याबद्दल दुमत नाही. परंतु, या पोस्टमध्ये “आज फलटण तहसील कार्यालयात माझ्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली” असा उल्लेख करून आमदारांनी प्रशासकीय अधिकारांचे उघडपणे अतिक्रमण केले आहे.

भारतीय संविधानाने कायदेमंडळ (विधिमंडळ) आणि कार्यकारी मंडळ (प्रशासन) यांच्या अधिकारांची स्पष्ट विभागणी (Separation of Powers) केली आहे. तहसीलदारांची खुर्ची ही केवळ बसण्याची जागा नसून, ते राज्य शासनाच्या महसुली आणि दंडाधिकारी अधिकारांचे (Executive Magistrate) घटनात्मक प्रतीक आहे. त्या खुर्चीवर बसून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा अधिकार कोणत्याही लोकप्रतिनिधीला नाही. हा प्रकार म्हणजे प्रशासकीय नियमांचा आणि लोकशाही संकेतांचा घोर अवमान आहे.

शासनाचे नियम अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्यास सांगतात. मात्र, लोकप्रतिनिधींनी थेट अधिकाऱ्यांच्या अधिकृत आसनावर बसून स्वतःकडे प्रशासकीय अधिकार घेण्याचा प्रयत्न करणे, ही कृती अत्यंत आक्षेपार्ह आहे. आज आपला शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणूस तहसील कार्यालयात न्यायासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी येत असताना, आमदारांनी अशा प्रकारे खुर्चीवर बसून अधिकारांचे प्रदर्शन करणे लोकशाहीत अपेक्षित नाही. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकारांचे आणि मनोबलाचे खच्चीकरण होत आहे.

आम्ही या असंवैधानिक आणि नियमबाह्य कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करतो. आमदार महोदयांनी या कृतीबद्दल प्रशासनाची आणि जनतेची जाहीर माफी मागावी. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रशासकीय कार्यालयांचे पावित्र्य राखण्यासाठी पावले उचलावीत. अन्यथा या प्रवृत्तीविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा आम्ही देत आहोत.

लोकशाहीत जनता मालक असते आणि संविधानाने सर्वांना त्यांच्या मर्यादा आखून दिल्या आहेत, याचे भान सर्वांनीच राखले पाहिजे.

असे मत व्यक्त करत फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आमदार सचिन पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा  सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली गॅलेक्सी मल्टिस्टेटची ८ वी शाखा तर अवघ्या वर्षभरात बारामतीत दुसरी शाखा सुरू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!