फलटण : सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे करण्यावर निर्बंध असतानाही शहरातील सोमवार पेठ येथील श्री फिरंगाई देवी मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे केले जात असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाढदिवस शांतपणे साजरे न करता मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. डीजे व साऊंड सिस्टिमचा वापर परवानगीशिवाय केला जात असल्याचा आरोप असून, मोठ्या फटाक्यांची आतषबाजी करून ध्वनी व वायू प्रदूषण वाढविले जात आहे.
विशेष म्हणजे, सोमवार पेठेतील विविध भागांतील युवकही आपले वाढदिवस याच ठिकाणी साजरे करत असल्याने परिसरातील रहिवाशांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. आनंदोत्सव साजरा करताना नागरिकांच्या शांततेचा व सार्वजनिक सुव्यवस्थेचा विचार केला जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सततच्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसरातील नवजात बालके, गरोदर महिला, आजारी रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमांमुळे नागरिकांच्या झोपेचा व दैनंदिन जीवनाचा खोळंबा होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकारांविरोधात लोकप्रतिनिधी किंवा संबंधित यंत्रणांनी लक्ष घालावे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक जण उघडपणे तक्रार करण्यासही धजावत नसल्याचे बोलले जात आहे.






