फलटण : फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 अंतर्गत तब्बल ८ हजार ९०० घरकुलांना मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या मंजूर लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्षात किती जण खरे गरजू आहेत, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही मंजूर लाभार्थ्यांकडे पक्की घरे असल्याचा दावा करण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये बेघर नागरिक, भाड्याच्या घरात राहणारे कुटुंबे तसेच स्वतःचे पक्के घर नसलेले गरजू नागरिक अद्यापही घरकुल योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो आहे का, याची सखोल तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून गावोगावी प्रत्यक्ष पाहणी व पडताळणी करण्यात आली होती. या प्रक्रियेत काही अपात्र व्यक्ती पात्र ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, काही लाभार्थ्यांकडून घरकुल मंजुरीसाठी पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर AP न्यूजचे संपादक प्रा. अमोल पवार यांनी सातारा जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांना निवेदन देऊन घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची सखोल फेरपडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, गावागावात जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून, अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले असल्यास संबंधितांवर विभागीय चौकशी व नियमानुसार कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनातील बाबी गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधित बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असे सांगितल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.
आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या प्रकरणात काय भूमिका घेतात, तसेच घरकुलांच्या मंजूर यादीची फेरपडताळणी आणि कथित गैरप्रकारांची चौकशी होते का, याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, घरकुल योजनेतील अपात्र लाभार्थी आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप यांची अधिकृत चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर येणे आवश्यक आहे. खऱ्या गरजू कुटुंबांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.
फलटण तालुक्यातीलघरकुल योजनेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
By Team LBNN
On: August 19, 2026 8:35 AM












