नियम, पात्रता आणि निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत साताऱ्यात प्रश्न
सातारा : जिल्ह्यात अनेक व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शासनाने या पदासाठी काही पात्रता व निकष निश्चित केलेले असताना, या नियुक्त्या नेमक्या कोणत्या आधारावर केल्या जातात, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
संबंधित व्यक्तीची पात्रता, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक योगदान यासोबतच राजकीय शिफारस किंवा नेत्यांशी असलेला संपर्क नियुक्तीत प्रभावी ठरतो का? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी शासनाचे निकष असताना, वशिल्याशिवाय नियुक्ती होते का? अशी चर्चाही सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नियुक्त्यांची अधिकृत यादी, पात्रता, नियुक्तीचा आधार आणि शिफारस प्रक्रिया प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या नियुक्त्या शासनाच्या नियमांनुसार झाल्या आहेत की त्यामध्ये राजकीय शिफारशींचा प्रभाव आहे, हे अधिकृत कागदपत्रे आणि प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.











