फलटण : सातारा वनविभाग (प्रादेशिक), सामाजिक वनीकरण विभाग सातारा, सह्याद्री व्याघ्र राखीव (वन्यजीव) कराड आणि कुंडल वन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित वारी वृक्षदिंडी’ उत्साहात पार पडली. वनविभागाने २०१९ पासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तरडगाव ते सुरवडी असा सुमारे १४ किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात आला.
हरित वारी वृक्षदिंडीचा शुभारंभ मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर श्रीमती श्रीलक्ष्मी ए. यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक सातारा अमोल सातपुते, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सांगली सागर गवते, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सावंतवाडी मिलिश शर्मा, कुंडल वन अकादमीचे प्रशासकीय व व्यवस्थापक हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) रेश्मा व्होरकाटे, अप्पर संचालक (प्रशासन) भरत शिंदे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे, विभागीय वन अधिकारी जळगाव महेश झांजुर्णे यांच्यासह सुमारे ३५० वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यंदाच्या हरित वारीतील विशेष आकर्षण म्हणजे मौजे काळज येथे राज्यातील पहिल्या ‘हरितवारी वन’ या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वनामध्ये पिंपळ, वड, उंबर, बेल, कैलासपती, चाफा, आंबा आदी पौराणिक व धार्मिक महत्त्वाच्या एकूण ३७५ वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हिरवागार करण्याच्या संकल्पाची यानिमित्ताने वनविभागाने सुरुवात केली.
यावेळी वारकऱ्यांना ५० हजार सीडबॉल तसेच विविध जंगली वृक्षप्रजातींची बियाणे वाटप करण्यात आले. पंढरपूरकडे जाताना रस्त्याच्या कडेला ही बियाणे पेरण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच वनसंरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि वनविभागाच्या विविध योजनांविषयी माहितीपर पुस्तिकांचेही वितरण करण्यात आले.
राज्यातील पहिल्या ‘हरितवारी वन’ संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी आणि वृक्षदिंडीचे प्रभावी आयोजन करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) फलटण निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण) फलटण विजय रामटेके तसेच फलटण येथील वनपाल, वनरक्षक आणि वन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.











