फलटण – फलटण वनपरिक्षेत्रातील मौजे आदर्की खुर्द येथे रानडुक्कराची शिकार करताना चार जणांना वनविभागाने रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. ३० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वनरक्षक आदर्की यांनी प्रथम वनगुन्हा रिपोर्ट क्र. ०१/२०२६ नुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या कलम २(१६), ९, ३९ व ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सोमनाथ बाळू भंडलकर (वय ५०), अतुल रमेश जाधव (वय २०), विक्रम संतोष डोंबाळे (वय २४) आणि गणेश लक्ष्मण जाधव (वय २५), सर्व रा. आदर्की खुर्द, ता. फलटण, जि. सातारा यांचा समावेश आहे.
दि. ३१ जुलै २०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना एक दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून तीन मोबाईल फोन आणि TVS मोटारसायकल (क्रमांक MH11BU4585) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वनविभागाने नागरिकांना आव्हान केले आहे की, वन्यप्राण्यांची शिकार करणे, अवैध वाहतूक करणे, अवैध वृक्षतोड करणे तसेच राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करणे हे कायद्याने गुन्हे असून अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर, वनपाल महादेव पाटील, वनरक्षक सुरज इनकर, वनरक्षक विशाल शिंदे, वनरक्षक वडले तसेच फलटण वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर करीत आहेत.
आदर्की खुर्द येथे रानडुक्कराच्या शिकारीप्रकरणी चौघांना अटक; वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
By Team LBNN
On: July 31, 2026 9:33 PM












