फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या तसेच चोरीस गेलेल्या मोबाईलबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी CEIR पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संबंधित मोबाईल कोणत्या ठिकाणी व कोणत्या सिमकार्डवर वापरला जात आहे, याची माहिती घेण्यात आली.
तपासादरम्यान अनेक मोबाईल सातारा जिल्ह्याबाहेर तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या परराज्यांमध्ये वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील मोबाईल परत घेण्यात आले.
काही मोबाईल प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले, तर काही मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात मागविण्यात आले. तसेच, काही तक्रारदार दूरवर राहत असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता भासू नये म्हणून संबंधित मोबाईल कुरिअरद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठविण्याची सोय करण्यात आली.
सप्टेंबर २०२६ अखेर एकूण ७१ मोबाईल शोधून हस्तगत करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले असून, या मोबाईलची अंदाजे बाजारातील किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर तसेच मा. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, CEIR पोर्टलचे काम पाहणारे कर्मचारी श्रीनाथ कदम, तसेच पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे आणि हनुमंत दडस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरविलेले मोबाईल शोधण्यात यश,तब्बल १२ लाख ८० हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत
By Team LBNN
On: October 3, 2026 3:07 PM












