फलटण : फलटण तालुका इंग्रजी असोसिएशन, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, पंचायत समिती शिक्षण विभाग गट साधन केंद्र व तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय इंग्रजी कार्यशाळा उत्साहात पार पडली. मुधोजी हायस्कूल, फलटण येथे झालेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या वर्गांना इंग्रजी विषय शिकविणारे शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यशाळेत उच्चारणशास्त्र, अध्यापनामध्ये ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) कुशलतेने वापर, दहावी बोर्ड इंग्रजी विषयाचे मूल्यमापन तसेच भाषा अलंकार या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा सत्रे घेण्यात आली. सुलभक म्हणून श्री. पंकज बोबडे, श्री. सुजित जमदाडे व श्री. चंद्रकांत सस्ते यांनी कामकाज पाहिले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण चे प्राचार्य श्री. जितेंद्र साळुंखे यांनी फलटण तालुका तसेच सातारा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात पायलट म्हणून उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याचे सांगितले.
समारोपप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. सी. जी. मठपती यांच्या हस्ते सेवानिवृत्त इंग्रजी शिक्षक तसेच नव्याने नियुक्त झालेल्या इंग्रजी असोसिएशनच्या सभासदांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सर्वानुमते फलटण तालुका इंग्रजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. पंकज बोबडे, उपाध्यक्षपदी सौ. शारदादेवी मोहिते व सचिवपदी श्री. सुजित जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी बीआरसी समन्वयक सौ. दमयंती कुंभार, इंग्रजी असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्राचार्य श्री. सावंत एस. व्ही. तसेच मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
फलटण येथे एक दिवसीय इंग्रजी कार्यशाळा उत्साहात
By Team LBNN
On: September 17, 2026 8:15 PM












