फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत फलटण नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत व्यापक उपाययोजना हाती घेतली आहे. नगराध्यक्ष श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची सुरक्षित निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली असून त्यांना नियमित अन्न व पाणीही उपलब्ध करून दिले जात आहे.
या मोहिमेअंतर्गत भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, त्यांच्या वाढत्या प्रजननावर नियंत्रण मिळवण्यासाठी शस्त्रक्रियाही केली जात आहे. त्यामुळे भविष्यात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारखा जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो. विशेषतः पालखी सोहळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात लाखो वारकरी शहरात मुक्कामासाठी येत असल्याने गर्दीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. गर्दीमुळे घाबरलेले कुत्रे कधीकधी नागरिक किंवा वारकऱ्यांवर धावून जाण्याच्या घटना घडू शकतात. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने वेळेआधीच नियोजनबद्ध मोहीम राबवली आहे.
यंदा १७ जुलै रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा फलटण शहरात मुक्काम असून, त्याआधी राबविण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच प्राणी कल्याणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. नगराध्यक्ष श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
भटक्या कुत्र्यांवर फलटण नगरपालिकेची प्रभावी मोहीम; पालखी सोहळ्यापूर्वी रेबीज लसीकरण व नसबंदीला वेग
By Team LBNN
On: July 2, 2026 9:36 AM











