फलटण शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी संतापजनक घटना समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १८ वर्षीय नर्सिंग प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी नर्सिंगचे शिक्षण घेत असून इंटर्नशिपसाठी ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात येत होती. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास, तिची आई जेवण आणण्यासाठी बाहेर गेली असताना, रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेला एक कंत्राटी कर्मचारी तिच्या वॉर्डमध्ये शिरल्याची माहिती आहे.
पीडित तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन करत अश्लील संवाद साधला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर सवाल
या घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आरोपी हा त्याच रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. रुग्ण आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा कितपत प्रभावी आहे, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महिला संघटनांचा आक्रमक पवित्रा
या घटनेनंतर फलटण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिला संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून कमी करावे, तसेच त्याच्यावर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण यंत्रणेतील त्रुटी दाखवणारा आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही व्यवस्था, रात्रीची सुरक्षा गस्त आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.










