मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र, या नियुक्तीबाबत राज्य शासनाकडून कोणतीही अधिकृत विचारणा झालेली नसल्याचे स्वतः डॉ. बोरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी गेल्या महिन्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. त्यानंतर विविध नावांची चर्चा सुरू असतानाच डॉ. बोरवणकर यांच्या नियुक्तीबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
गेल्या सोमवारी दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणात पसरली. अनेकांनी डॉ. बोरवणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे समोर आले.
दरम्यान, मंगळवारी त्यांनी संदेशाद्वारे प्रतिक्रिया देताना, “महिला आयोगासंदर्भातील नियुक्तीची चर्चा ही अफवा आहे. मी सध्या उन्हाळी सुट्टीनिमित्त न्यूझीलंडमध्ये आहे,” असे स्पष्ट केले.
यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा अफवा
By Team LBNN
On: May 6, 2026 12:37 PM











