फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बीएल-२ सदस्यांसह सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती आणि फलटण नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा जाहीर सत्कार समारंभ कोळकी (फलटण) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित होते.
यावेळी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, मा. खासदार राहुल शेवाळे, माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील, श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “या मतदारसंघात आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये आम्हाला रेडीमेड शिवसेना मिळाली आहे.”
ते पुढे म्हणाले की, याचा अर्थ असा नाही की यापूर्वी येथे शिवसेनेचे संघटन नव्हते, मात्र पक्षाची ताकद त्या प्रमाणात नव्हती. आता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
उदय सामंत यांनी औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जगातील पोटॅशियम परमॅग्नेट निर्मिती करणारा तिसऱ्या क्रमांकाचा कारखाना या परिसरात कार्यरत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा केवळ साखर उत्पादनासाठीच नव्हे, तर औद्योगिक उत्पादनासाठीही ओळखला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या कारखान्याला एमआयडीसीमध्ये जागा देणार त्या सोबतच अतिरिक्त एमआयडीसीसाठी यश मिळेल.
यावेळी त्यांनी श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर आमदार झाले तर आनंदच होईल, असे सांगत त्यांना आमदार करण्याची लोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण घेतल्याचेही स्पष्ट केले.
फलटणमध्ये आम्हाला रेडीमेड शिवसेना मिळाली,श्रीमंत संजीवराजे आमदार झाले तर आनंदच – मंत्री उदय सामंत
By Team LBNN
On: May 27, 2026 9:37 PM












