सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

क्रांतिसिंह नाना पाटील गृहरचना संस्थेच्या सदस्यांना आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी; परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” नाव देण्याचाही आग्रह

On: July 3, 2026 6:11 PM
Follow Us:

फलटण – सोमवार पेठेतील क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्थेच्या संस्थापक सदस्यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवास योजनेचा लाभ देऊन निवासी जागा नियमित करण्यात याव्यात. तसेच संबंधित परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार दिवंगत लोकनेते हिंदुराव ना. निंबाळकर यांनी आपल्या कार्यकाळात सोमवार पेठेतील काही कुटुंबप्रमुखांना एकत्रित करून त्यांच्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्थेची स्थापना केली होती.

या संस्थेतील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली असून काही मूळ कुटुंबे अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. या कुटुंबांतील वारसदार व सदस्य आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी फलटण नगरपालिकेकडे सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांचा योग्य प्रकारे विचार होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळातील बहुतांश पदाधिकारी हयात नसून अनेक सदस्य व त्यांचे वारसदार स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे संस्थेची मूळ कार्यकारिणी सध्या अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत संस्थेतील मूळ संस्थापक सदस्य अथवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांनी केलेल्या अर्जांचा स्वतंत्रपणे विचार करून शासन निर्णयानुसार निवासी जागा नियमित करण्यासह आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने २५ मार्च २०२६ रोजी शासकीय जागेवरील १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार संबंधित परिसरातील रहिवासी तसेच संस्थेचे संस्थापक सदस्य किंवा त्यांचे वारसदार निवासी जागा नियमित करण्यासाठी फलटण नगरपालिकेकडे अर्ज करत आहेत. शासन निर्णयानुसार पात्र कुटुंबांच्या अर्जांचा सकारात्मक विचार करून निवासी जागा नियमित करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, फलटण नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत फिरंगाई देवी मंदिर परिसराला “श्री फिरंगाई देवी नगर” असे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. मात्र संबंधित जागा क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्थेच्या नावावर असून त्याची नोंद फलटण नगरपालिका तसेच महसूल विभागाकडे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तत्कालीन खासदार दिवंगत हिंदुराव ना. निंबाळकर यांच्या दूरदृष्टीचा सन्मान म्हणून संबंधित परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” असे नाव देण्यात यावे. तसेच शहरातील विविध परिसरांप्रमाणे या भागालाही महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणारे नाव देण्याबाबत आगामी सर्वसाधारण सभेत पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र व वंचित कुटुंबांच्या निवासी जागा नियमित करून त्यांना आवास योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी लोकशाही भारत न्यूजचे संपादक सागर चव्हाण यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

हे ही वाचा  फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!