फलटण : फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर शहरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी हा व्हिडिओ अर्धवट स्वरूपात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करत, त्यामुळे जाधव यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे.
सध्या अशोकराव जाधव यांच्यावर अपघातानंतर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वीच्या एका घटनेशी संबंधित असल्याचे सांगितला जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर “फलटणचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी तृतीयपंथीयांकडे भलतीच मागणी केली” अशा मथळ्यासह प्रसारित करण्यात आला.
मात्र, संबंधित व्हिडिओ पूर्ण नसून त्यामध्ये जाधव नेमके कोणत्या संदर्भात बोलत होते किंवा त्यांनी कोणती मागणी केली होती, हे स्पष्ट होत नसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संदर्भविरहित अथवा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्नही काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. संपूर्ण व्हिडिओ आणि वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे स्पष्ट चित्र समोर येईल, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत
नगरसेवक अशोकराव जाधव यांचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल; बदनामीचा प्रयत्न झाल्याचा नागरिकांचा आरोप
By Team LBNN
On: July 4, 2026 9:52 AM








