सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

On: August 3, 2026 4:38 PM
Follow Us:

सस्तेवाडी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी (७५ वे वर्ष) उपक्रमांतर्गत तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, सस्तेवाडी येथे महिला पालक व विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात योगगुरू सौ. रेखा भरत खिलारे (योगरेखा योग इन्स्टिट्यूट, फलटण) यांच्यासह योगशिक्षिका प्रणाली सोनिक गाडेकर, राधिका सतीश नाळे, दिपाली पिसाळ आणि पूजा शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी योगासनांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, संतुलित आहार, पुरेशी झोप, प्राणायाम आणि योग्य जीवनशैली याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी तसेच महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

योगगुरू सौ. रेखा खिलारे यांनी महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच स्वतःच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. योग्य आहार, प्रथिने, जीवनसत्त्वयुक्त अन्न, हिरव्या पालेभाज्या, फळे, पुरेसे पाणी आणि वेळेवर जेवण यामुळे निरोगी जीवन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

योगशिक्षिकांनी चुकीच्या बसण्याच्या व उभे राहण्याच्या सवयींमुळे पचनसंस्था व श्वसनसंस्थेवर होणारे दुष्परिणामही उदाहरणांसह स्पष्ट केले. वाकून बसल्यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होतात, तसेच छातीचा विस्तार कमी झाल्याने फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन थकवा व एकाग्रतेत घट येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

सकाळी १०.३० वाजता झालेल्या या योग सत्राला महिला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, सस्तेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. रुपेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. अनिता बागल यांनी केले, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्याची माहिती तेजस्विनी शिंदे यांनी दिली. आभार प्रदर्शन सौ. शर्मिला माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हे ही वाचा  फलटण प्रभाग क्रमांक चार व आठ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!