फलटण – गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था, मोठे खड्डे आणि रस्त्यांवरील चर यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
याबाबत फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन देण्यात आले. फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत असून पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या काही दिवसांत गौरी-गणपतीचा उत्सव सुरू होत असून सार्वजनिक गणपती मंडळांचे गणपती आगमन, विसर्जन मिरवणुका तसेच घरगुती गणपतींची ने-आण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून होणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याने उत्सवापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस कमिटीने भगवान महावीर स्तंभ ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक, महात्मा गांधी चौक, तेली गल्ली, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते नेहरू पुतळा (बारस्कर गल्ली) या मार्गासह शंकर मार्केट ते शुक्रवार तालीम गणपती मंदिर, निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर ते उपळेकर महाराज मंदिर, अॅड. नरेंद्र कृष्णचंद्र भोईटे यांच्या घरापासून अॅड. एन. एम. यादव यांच्या घरापर्यंतचा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाचबत्ती चौक आणि आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक चौक ते रथखाना या प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे.
काँक्रीटीकरणाच्या कामातील पाईपलाईन लिकेजचाही मुद्दा
फलटण शहरातील पालखी रस्त्याच्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामाबाबतही निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. गिरवी नाका चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदानासमोर तसेच पृथ्वी चौकाजवळ रस्त्याखालील पाईपलाईनला लिकेज असतानाही त्यावर काँक्रीटीकरण करण्यात आल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या ठिकाणांची पाहणी करून संबंधित कंत्राटदारास योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आणि काँक्रीटीकरणाच्या कामापूर्वी किंवा त्यानंतर निर्माण झालेल्या पाईपलाईन लिकेजची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आगामी सणासुदीचा काळ, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन शहरातील प्रमुख रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
यावेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण नगर परिषदेचे नगरसेवक पंकज पवार, फलटण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष अल्ताफ पठाण, मनोहर गायकवाड, लक्ष्मण तात्या शिंदे, मंजेखान मेटकरी आणि गंगाराम रणदिवे उपस्थित होते.
गौरी-गणपती उत्सवापूर्वी फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; फलटण तालुका काँग्रेसची मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनातून मागणी
By Team LBNN
On: August 10, 2026 7:56 PM












