जमीन भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतराच्या प्रक्रियेत बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप; तिघांना अटक, २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
फलटण : फलटण तालुक्यातील मौजे कोळकी येथील गट क्रमांक ७९/१/१, ७९/१/५ आणि ८०/१ या जमिनीच्या भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्या तक्रारीवरून दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी रणधीर धनसिंगराव भोईटे (वय ५३, रा. संजीवराजेनगर, फलटण), राजेंद्र सदाशिव कापसे (वय ५६, रा. जाधववाडी, ता. फलटण) आणि विक्रम महादेवराव झांजुर्णे (वय ५३, रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांना दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, फलटण यांच्या न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील इतर संशयितांची भूमिका तसेच बनावट मूल्यांकन दाखला तयार करण्यामागील बाबींचा पोलीस तपास सुरू आहे.
> “फलटणमध्ये नजराणा भरताना जवळपास २० लाख रुपयांची शासनाचीच फसवणूक झाल्याने तहसीलदारांच्या तक्रारीवरून आठ बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने फलटण तालुक्यात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतराची प्रक्रिया झालेल्या सर्वच जमिनींच्या मूल्यांकनाची सखोल चौकशी करण्यात यावी. शासनाने यासाठी विशेष समिती नेमून सर्व प्रकरणांची तपासणी करावी.”
अक्षय साळवे, साखरवाडी
बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक; फलटण शहर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा
By Team LBNN
On: August 23, 2026 1:53 PM












