सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीराम कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

On: August 24, 2026 3:21 PM
Follow Us:

फलटण : राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक म्हणून ओळख असलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

श्रीराम सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आवाहनानंतर कारखान्याच्या सभासदांकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांचे शेअर्स जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

फलटण तालुक्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना सुरू होणे गरजेचे असल्याची भूमिका शेतकरी आणि सभासदांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अपेक्षित भांडवल अद्याप जमा न झाल्याने कारखाना सुरू होण्याचा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, श्रीराम कारखान्याच्या मुद्द्यावरून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गेल्या काही काळापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याने फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला की, “या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच हा कारखाना बंद करायचा आहे का?” तसेच सरकारचे धोरण नेमके काय आहे, सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगी कारखान्यांना मदत करण्याचे धोरण आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा  डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

दरम्यान, श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. कारखाना सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याबरोबरच गरज पडल्यास आंदोलन करून सरकारला श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!