सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आत्महत्येचा विचार करणार्या लोकांच्या बाजुने…..

On: September 11, 2026 6:56 PM
Follow Us:

रात्रीचे जवळपास दोन वाजले होते.घरात सगळे झोपले होते.पण आनंदच्या डोळ्यांना झोप येत नव्हती.
मोबाईल त्याच्या हातात होता.WhatsApp वर अनेक unread messages होते.आईचा एक मेसेज “जेवलास का रे?”,मित्राचा मेसेज “उद्या भेटतोय ना?”आणि ऑफिसचा मेसेज “Need the report by 9 AM.”
आनंदने फोन बाजूला ठेवला.छताकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला“सगळ्यांना माझ्याकडून काहीतरी हवंय पण नेमकं मला काय हवंय, हे कुणीच विचारत नाही…मी का शांत आहे हे कोणीच जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही”.
तसा आनंद काही दिवसांपासून बदलला होता.
ऑफिसमध्ये तो काम करत होता.घरी तो हसत होता.
मित्रांसोबत तो jokes करत होता.Instagram वर त्याचे फोटो अजूनही होते.लोकांना वाटत होतं
“आनंद ठीक आहे.”पण तो काही मानसिकरित्या ठीक नव्हता.त्याच्या मनात रोज एकच विचार फिरत होता
“माझ्याकडून काहीच होत नाही.मी जे करायला हवं ते यशस्वी होत नाही” नोकरीत अपेक्षेप्रमाणे performance होत नव्हता.घरच्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्या अपेक्षांच त्याला ओझं झालं होतं…एका मित्राचं promotion झालं होतं.दुसऱ्याचं लग्न झालं होतं.
तिसऱ्याने घर घेतलं होतं आणि त्यात आनंद?
तो स्वतःच्याच आयुष्यात मागे पडल्यासारखा वाटत होता.
तो स्वतःला विचारायचा “सगळे पुढे जातायत…मीच का मागे राहिलोय? त्यांच्यापेक्षा माझे कष्ट कुठे कमी पडताय?”
एका दिवशी ऑफिसमध्ये बॉसने त्याला सगळ्यांसमोर सुनावलं.“तुझ्याकडून एवढी साधी गोष्टही होत नाही?”
तिथे सगळे शांत होते.आनंदही शांत होता.तो फक्त मान खाली घालून उभा राहिला.पण त्या दिवशी बॉसची ती वाक्यं ऑफिसच्या बाहेरही त्याच्यासोबत आली.
तो घरी आला.आईने आनंदचा चेहरा बघून विचारलं
“काय झालं?”तो म्हणाला “काही नाही.”पण त्यानंतर आईने पुन्हा विचारलं नाही.कारण आईला वाटलं “मोठा झालाय… त्याच्या काही समस्या असतील तर तो सांगेल.”पण आनंदच्या मनात त्या रात्री एक विचार आला
“मी सांगितलं तरी कोणाला समजणार आहे का?”
आणि इथेच आपण थांबायला हवं.
कारण बाहेरून पाहताना आपल्याला वाटतं
“एवढ्याशा गोष्टीसाठी कोणी आत्महत्या कशी करू शकतं?”पण कदाचित…ती “एक गोष्ट” नसते.
ती अनेक महिन्यांची निराशा असते.अनेक दिवसांचं एकटेपण असतं.अनेक वेळा गिळून टाकलेलं दुःख असतं.
अनेकदा न बोललेलं अपयश असतं.अनेकांचे मनाला लागलेले टोमणे असतात.अनेकदा“मी कोणासाठीच पुरेसा नाही”ही भावना असते.आणि जेव्हा माणूस खूप काळ आतून त्रास सहन करतो तेव्हा त्याला ती समस्याच संपवायची असते.पण त्या क्षणी त्याला असं वाटू शकतं की
समस्या संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःच संपणं… आत्महत्या करणं…इथे त्याला किंवा एखाद्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला दोष देण्याआधी त्याची वेदना समजून घेणं गरजेचं आहे.
कारण आत्महत्येचा विचार करणारा प्रत्येक माणूस “कमजोर” नसतो.काही लोक वर्षानुवर्षे खूप मजबूत राहिलेले असतात.सगळ्यांच्या समस्या ऐकणारे असतात.सगळ्यांना आधार देणारे असतात.नेहमी सकारात्मक दिसतात.पण एक दिवस त्यांनाही आधाराची गरज पडते.आणि दुर्दैवाने त्याच वेळी आपण त्यांना म्हणतो“Strong रहा.”“इतकं काय tension घेतोस?”,“Positive विचार कर.”“तुझ्यापेक्षा कितीतरी लोकांचं वाईट चाललंय.”पण खरं सांगू का दुःखाची तुलना करता येत नाही.या जगात दुःख जरी सगळ्यांच्या वाट्याला आलेलं असलं तरी भोगणाऱ्या वेदना त्रासदायकच जाणवतात..ज्याच्या पायाला काटा टोचला आहे, त्याला “दुसऱ्याच्या पायात तर खिळा आहे” असं सांगून त्याचा काटा निघत नाही ना…त्याचा त्रास कमी करण्यासाठी…कुणीतरी त्याच्याजवळ बसावं लागतं.तो काटा अलगद काढायलाच लागतो….
आता यात आपण समाज म्हणून नक्की काय करू शकतो कदाचित सुरुवात फार मोठी असण्याची गरज नाही.तुमच्या आयुष्यात कोणी अचानक शांत झालं असेल…लोकांपासून दूर जाऊ लागलं असेल…नेहमीचा आनंद त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत नसेल वारंवार “माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय” असं म्हणत असेल…तर त्याला ignore करू नका.
त्याच्याकडे जाऊन फक्त एवढं विचारा “तू खरंच ठीक आहेस का?”आणि त्याने “हो” म्हटलं तरी एकदा पुन्हा सांगा“खरंच काहीही असेल तर मला सांग. मी judge करणार नाही.”कधी कधी माणसाला solution आधी नको असतो.पहिल्यांदा त्याला ऐकून घेणारा माणूस हवा असतो.आणि जर कोणी तुम्हाला सांगितलं “मला जगायचं नाही.”तर घाबरून त्याला ओरडू नका.“असं बोलू नकोस!”,“तुला लाज वाटत नाही का?”“तुझ्या आई-वडिलांचा विचार कर!”असं म्हणण्याऐवजी थोड शांत राहा.शांततेने त्याच्या भावनांचा विचार करा कारण त्याक्षणी त्याची मनस्थिती नसते चांगलं वाईट समजून घेण्याची…
त्याचं जे असेल ते म्हणणं ऐका.त्याला एकटं सोडू नका. त्याचे विश्वासू कुटुंबीय किंवा मित्राला परिस्थिती सांगा आणि शक्य तितक्या लवकर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत मिळवून द्या जर खूप गरज भासत असेल तर…
जर धोका तातडीचा वाटत असेल, तर व्यक्तीला एकटं ठेवू नका आणि स्थानिक emergency medical services कडे तातडीने संपर्क करा.मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही. ते जगण्याच्या बाजूने घेतलेलं पाऊल आहे.हेच त्या व्यक्तीलासुद्धा आपल्याला पटवून देता यावं एवढं सक्षम आपणही असावं…
आणि आनंदचं काय झालं?
त्या रात्री त्याने कोणालाही काही सांगितलं नाही.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या बहिणीने त्याला फोन केला तेही एका साध्या कारणासाठी.
ती म्हणाली “काय रे… आवाज असा का वाटतोय? सगळं ठीक आहे ना?”आनंद काही सेकंद शांत राहिला.
मग पहिल्यांदा तो म्हणाला “नाही.” इतकंच. पण त्या एका शब्दाने…त्याच्या मनात बंद असलेला दरवाजा पहिल्यांदा उघडला.तो बोलला.खूप बोलला.अगदी मनातलं सगळं सांगून त्याला हलकं जाणवेपर्यंत…
याने समस्या काही लगेच सुटल्या नाहीत.
नोकरीची समस्या तशीच होती.पैशांची चिंता तशीच होती.
अपयशाची भावना तशीच होती.पण यात एक गोष्ट बदलली होतीआता तो त्या समस्यांसोबत एकटा नव्हता.
काही दिवसांनी त्याने professional help घेतली.
हळूहळू त्याला समजायला लागलं “मला माझं आयुष्य संपवायचं नव्हतं… मला फक्त हे दुःख संपवायचं होतं.”
आणि दुःख संपवण्यासाठी आयुष्य संपवण्याव्यतिरिक्तही मार्ग असतात आपल्या जवळच्या माणसांच्या मदतीने.
आत्महत्येबद्दल बोलताना आपण फक्त “आत्महत्या करू नका.”एवढंच सांगून थांबू नये.आपण हेही सांगायला हवं
“तुला जो त्रास होतोय तो मला सांग अगदी विश्वासाने”
“तू अपयशी झालास तरी तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस.”,“तुझं career बिघडलं तरी आयुष्य संपत नाही.”,“तुझं नातं तुटलं तरी तू तुटलेला माणूस नाहीस.”,“तू सध्या हरल्यासारखा वाटत असशील पण तुझी कहाणी इथे संपलेली नाही.” असं विचार केल्यावर सुचलेलं बरंच काही…
आपण एक समाज म्हणून कायम आत्महत्या करणाऱ्या लोकांकडे शंकेने बघत असु तसं सहाजिकच आहे प्रत्येकाने आपल्यावेळेचा मोठा संघर्ष पार केलेला असतो मग कोणीतरी वेगळं (जे आपल्याला छोट वाटतं) कारणासाठी आत्महत्या करतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचीच जास्त चीड येते…ते चुक आहे असं मी म्हणणार नाही पण प्रत्येक आत्महत्येचा विचार करणारा वेळेत सावरण्याच्या मनस्थितीतून नसतो गेलेला.आपल्याला माहिती नसतं तो व्यक्ती किती काळापासून शांततेच्या दिशाहिन मार्गातून जात असावा….
कधी कधी आपण माणसाला वाचवण्यासाठी त्याची समस्या सोडवू शकत नाही.पण आपण त्याच्यासोबत बसू शकतो दोन शब्द दिलासादायक बोलु शकतोच ना?
त्याला professional help पर्यंत घेऊन जाऊ शकतो.
त्याला सांगू शकतो अगदी पटवूनही देता यायला हवं “तुझ्या आयुष्यातला हा अध्याय कठीण आहे. पण संपूर्ण पुस्तक नाही.”
आपल्या आजूबाजूला जो माणूस सतत हसतोय तो दाखवतो तसं आनंदी असेलच असं नाही कारण डीप्रेशनमध्ये असलेला माणूस खूपच साधारण दिसतो….
जो “मी ठीक आहे” म्हणतोय तो खरंच ठीक असेलच असं नाही.आणि जो मदत मागत नाही त्याला मदतीची गरज नाही असंही नाही.
थोडं थांबा.. थोडं ऐका…. थोडं समजून घ्या….
कदाचित तुमचा एक फोन ,एक भेट, एक “मी तुझ्यासोबत आहे” हे वाक्य एखाद्याच्या(डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या) आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण ठरू शकतो…

(लेख आवडल्यास तुमच्या हक्काच्या व्यक्तींना नक्कीच शेअर करा)
-क्रांती ज्ञानेश्वर शेलार,९१५८३८५६९०

हे ही वाचा  आदर्की खुर्द येथे रानडुक्कराच्या शिकारीप्रकरणी चौघांना अटक; वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!