फलटण : भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले फलटण तालुक्यातील राजुरी गावचे सुपुत्र जवान अजित बाळासो बागाव (वय ३५) यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. देशसेवा बजावत असताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्याने राजुरी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सैनिकी परंपरा असलेल्या कुटुंबातील अजित बागाव हे जिद्दी आणि देशभक्तीने प्रेरित होते. लहानपणापासूनच भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आणि ते भारतीय सैन्यात भरती होऊन जम्मू-काश्मीर येथे देशसेवा बजावत होते. विशेष म्हणजे, त्यांचे वडीलही भारतीय सैन्यदलात कार्यरत होते.
जवान अजित बागाव यांच्या वीरमरणाची बातमी समजताच राजुरी गावासह फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांचे पार्थिव गोळेगाव पुनर्वसित (ता. फलटण) येथे आणण्यात आले. त्यानंतर फलटण येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रा फलटण शहरातून जात असताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्मा जवान अजित बागाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
जवान अजित बागाव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. राजुरी गावचे सरपंच, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी बागाव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
फलटणच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप; हुतात्मा अजित बागाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By Team LBNN
On: September 28, 2026 9:05 AM












