फलटण : भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना फलटण तालुक्यातील जवान अजित बाळासो बागाव हे शहीद झाले. देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाच्या पार्थिवावर फलटण शहरातील जुना पुणे-पंढरपूर रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवान अजित बागाव यांचे मूळ गाव राजुरी असून त्यांचे कुटुंब ठाकूरकी-गोळेगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्या निवासस्थानापासून अंतिम अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. शहरातून अंत्ययात्रा जात असताना नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित राहून वीर जवानाला अखेरची मानवंदना दिली.
प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची अधिकृत माहितीच देण्यात आली नव्हती?
शहीद जवानाच्या पार्थिवावर फलटण शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असतानाही, फलटण प्रशासनाकडून अंत्यसंस्काराचे ठिकाण, वेळ आणि शासकीय इतमामाबाबतची माहिती अधिकृतपणे सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांना देण्यात आली नव्हती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशासाठी शहीद झालेल्या जवानाच्या अंत्यविधीबाबत प्रशासनाकडून व्यापक स्वरूपात अधिकृत माहिती देणे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अपेक्षित असताना त्यात त्रुटी राहिली का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जर संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना अंत्यविधीची अधिकृत माहितीच मिळाली नसेल, तर त्यांच्या अनुपस्थितीमागे प्रशासनाचा माहिती-संवादाचा अभाव कारणीभूत होता का, याचे उत्तर प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
आमदार, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक उपस्थित; मात्र अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी अनुपस्थित
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडताना आमदार सचिन पाटील, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेतील अधिकारी उपस्थित असल्याची माहिती आहे.
मात्र तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय अधिकारी अंत्यविधीला उपस्थित नव्हते. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानाच्या अंत्यसंस्काराला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती का राहिली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अनुपस्थितीमुळे जातीय भेदभावाचा प्रश्न?
शहीद जवान अजित बागाव हे अनुसूचित जातीतील मातंग समाजाचे असल्याने त्यांच्या अंत्यविधीला काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही केवळ योगायोग होता की त्यामागे सामाजिक अथवा जातीय कारण होते, असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर संबंधित आजी माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या स्पष्टीकरणातूनच स्पष्ट होणे आवश्यक आहे.
“जवानाची जात नाही, त्याचे बलिदान मोठे”
देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानाची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी न पाहता त्याला अखेरची मानवंदना देणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या दुःखाच्या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असते.
त्यामुळे या प्रकरणात दोन महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत—
एक, शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराची अधिकृत माहिती देण्यात आली होती का? आणि दोन, माहिती देण्यात आली असेल तर अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व अधिकारी अंत्यविधीला अनुपस्थित का राहिले नाही ?
या दोन्ही प्रश्नांची प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी स्पष्ट उत्तरे देणे गरजेचे आहे.
शहीद अजित बागाव यांच्या अंत्यविधीवर प्रश्नचिन्ह; प्रशासनाच्या माहितीअभावी आजी-माजी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, जातीय भेदभावाचा प्रश्न
By Team LBNN
On: September 29, 2026 12:34 PM











