सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जादूटोण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; कुटुंबाला धमकीचे पत्र! फलटणमध्ये खळबळ

On: October 7, 2026 10:43 AM
Follow Us:


फलटण  : फलटण शहरात कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून, जादूटोण्याच्या नावाखाली कथित विधी केल्यानंतर तिला शाळेतून दुचाकीवरून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयित सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह फलटण शहरात राहत असून संशयिताचे कुटुंब त्यांच्या घरासमोर राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून कौटुंबिक संबंध होते. एकमेकांच्या घरी ये-जा असल्याने संशयिताचीही मुलीशी ओळख होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२५ पासून संशयिताने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तिला आपण आवडत असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.

त्यानंतर संशयिताने मुलीला तिच्या अंगात भूत शिरल्याचे कुटुंबीयांना सांगण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलीने त्यानुसार आईला सांगितल्यानंतर जादूटोण्यावर उपाय करण्याच्या नावाखाली तिच्या कुटुंबीयांसमक्ष कथित विधी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कथित विधीमध्ये मुलीच्या गळ्यात चामडीची वस्तू घालणे, बाहुलीवर विधी करणे आणि त्यानंतर तिच्या अंगातून भूत निघून गेल्याचे सांगणे, असा प्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी मुलीची आई आजारी असल्याने रुग्णालयात दाखल असताना संशयिताने मुलीला आपल्या घरी बोलावले. त्याने काळुबाई-मांढरदेवी येथे देवदर्शनासाठी जाण्याचे सांगितल्यानंतर मुलीला दुचाकीवरून तेथे नेल्याचा आरोप आहे. दर्शनानंतर दोघे फलटणला परतले. ही बाब त्याच दिवशी आई-वडिलांना सांगितली नसल्याचे मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर दोन-तीन दिवसांनी संशयिताने मुलीला शाळेजवळ गाठून आपण निरगुडी येथील जुन्या घरी जाऊ, असे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच त्या दिवशी शाळेत जाऊ नकोस, असे सांगून तिला दुचाकीवरून निरगुडी येथील जुन्या घरी नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयिताने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर तिला पुन्हा शाळेच्या गेटजवळ आणून सोडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

ऑगस्ट २०२६ मध्येही संशयिताने मुलीला शाळेजवळून दुचाकीवरून निरगुडी येथील जुन्या घरी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच फलटण शहरातील संशयिताच्या घरीही वेळोवेळी बोलावून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे मुलीने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

गणपती उत्सवाच्या काळात मुलगी आपल्या आजीकडे गेल्यानंतरही संशयिताने आजीच्या मोबाईलवर फोन व संदेश करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, संशयिताशी संपर्क असल्याची माहिती आई-वडिलांना मिळाल्यानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती घरातून कोणालाही न सांगता सरकारी बसने निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

प्रवासादरम्यान एका अनोळखी व्यक्तीने ती एकटी असल्याचे पाहून तिची चौकशी केली. मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघाल्याचे समजल्यानंतर त्या व्यक्तीने तिला जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिच्याकडून माहिती घेतल्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तिचे आई-वडील संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले.

कुटुंबीयांनी मुलीशी चर्चा केल्यानंतर तिने संशयिताकडून आपल्यासोबत घडलेल्या कथित प्रकाराची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर मुलगी आई-वडिलांसोबत फलटण शहर पोलीस ठाण्यात आली आणि संशयिताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. “आमचे सौरभ गुरु वरचे केस मागे घ्या, नाहीतर येत्या अमावस्येच्या आत सर्व कुटुंब संपवणार” अशा आशयाचे धमकीचे पत्र पीडित कुटुंबीयांच्या घराबाहेर ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. पत्रासोबत लिंबू ठेवण्यात आल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा फलटण शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. तपासादरम्यान पीडितेचा जबाब, वैद्यकीय तपासणी, शाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश, संबंधित ठिकाणांवरील पुरावे तसेच साक्षीदारांचे जबाब यांना महत्त्व राहणार आहे.

अल्पवयीन मुलीने केलेले आरोप गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे. तसेच धमकीच्या पत्राचा स्वतंत्र तपास करून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची गरज आहे.

हे ही वाचा  नराधमाला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; फलटणमध्ये नसरापूरच्या घटनेचा कडाडून निषेध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!