सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

रुग्णांसाठी डॉक्टर नव्हे, जणू विठ्ठलच! डॉ. प्रसाद जोशी यांच्या रुग्णसेवेची अनोखी कहाणी; वाढदिवसानिमित्त विशेष आढावा

On: October 13, 2026 10:00 AM
Follow Us:

फलटण: वैद्यकीय क्षेत्रातील यश केवळ शस्त्रक्रियांच्या संख्येवर मोजले जात नाही, तर रुग्णांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासातून, प्रेमातून आणि कृतज्ञतेतूनही ते दिसून येते. फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ तथा जोशी हॉस्पिटल प्रा. लि.चे चेअरमन व संचालक डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी यांनी आपल्या रुग्णसेवेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस, ससून जनरल हॉस्पिटलमधून एमएस ऑर्थोपेडिक्स तसेच डीएनबी ऑर्थोपेडिक्सचे शिक्षण घेतलेल्या डॉ. जोशी यांनी गुडघा व खुब्याचे सांधेरोपण, मणक्यांच्या शस्त्रक्रिया, आर्थ्रोस्कोपी तसेच रोबोटिक आणि कॉम्प्युटर नॅव्हिगेशनच्या साहाय्याने सांधेरोपण उपचार क्षेत्रात योगदान दिले आहे. माहितीनुसार, त्यांनी ४,००० हून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. सांधेरोपणानंतर पुन्हा चालता येणे, स्वतःची दैनंदिन कामे करता येणे आणि आत्मविश्वासाने जीवन जगता येणे, हा अनेक रुग्णांसाठी आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रुग्ण त्यांना खास हॉस्पिटलमध्ये भेट देऊन शुभेच्छा व्यक्त करतात. कोणी भेटवस्तू, कोणी पुष्पगुच्छ देतात, तर काही रुग्णांनी त्यांना विठ्ठलाप्रमाणे तुळशीचा मोठा हार घालून सन्मानित केले आहे. या कृतीतून रुग्णांच्या मनातील प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त होते. डॉ. जोशी यांच्या रुग्णसेवेचा अनुभव माझ्या स्वतःच्या कुटुंबालाही आला आहे. माझ्या वडिलांचे हिप रिप्लेसमेंट ऑपरेशन त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे केले. या उपचारांसाठी शासनाकडून आर्थिक मदतही मिळाली होती. माझ्या वडिलांची मानसिक स्थिती वेगळी असतानाही त्यांनी त्यांच्या परिस्थितीचा विचार करून योग्य काळजी घेतली, व्यवस्थित सेवा केली आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या या संवेदनशीलतेचा आणि सेवाभावाचा अनुभव मला स्वतःला आल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता व्यक्त करणे माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे.

डॉ. जोशी यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याच्या प्रवासात त्यांच्या सौभाग्यवती सौ. प्राची जोशी यांचीही मोलाची साथ लाभते. हॉस्पिटलमधील प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेऊन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. आरोग्याचा संदेश देताना डॉ. जोशी स्वतःही नियमित जीवनशैलीचा आदर्श ठेवतात. ते दररोज सकाळी लवकर उठून धावणे (रनिंग) आणि योगाभ्यास करतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि साखर व गोड पदार्थांचे अतिसेवन टाळण्याबाबत ते नागरिकांना मार्गदर्शन करतात. हाडांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार, पुरेसे कॅल्शियम व व्हिटॅमिन डी आणि नियमित शारीरिक हालचालींचे महत्त्वही ते सांगतात. त्यांना निसर्गाची विशेष आवड असून धावण्याच्या वेळी आढळणारे पशुपक्षी, वन्यजीव आणि निसर्गातील सुंदर दृश्ये ते आवर्जून छायाचित्रांत टिपतात. वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात छायाचित्रण करून निसर्गाप्रती असलेले प्रेम व्यक्त करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर पैलू आहे. पंढरपूरच्या विठ्ठलावर, गोंदवलेकर महाराजांवर, साईबाबांवर तसेच प्रभू श्रीराम आणि हनुमानावर त्यांची अपार श्रद्धा आहे. आरोग्यविषयक मार्गदर्शनासोबतच विविध ठिकाणी प्रवचनांच्या माध्यमातून ते अध्यात्मिक विचार, जीवनमूल्ये आणि जनजागृतीपर संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात. ‘आपली फलटण मॅरेथॉन’सारख्या उपक्रमांतूनही ते आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतात.

हे ही वाचा  लेखणीपासून व्यासपीठापर्यंत… संघर्षातून घडलेले सचिन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

डॉ. प्रसाद जोशी यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये नवी दिल्ली येथे त्यांना ‘इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड फॉर बेस्ट बिझनेस प्रॅक्टिसेस इन रूरल इंडिया’ हा पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये ‘भारत गौरव पुरस्कार’, तर २०१९ मध्ये ‘एक्सलन्स इन ऑर्थोपेडिक्स पुरस्कार’ आणि ‘आरोग्यरत्न पुरस्कार’ मिळाल्याची माहिती आहे. डिसेंबर २०२५ मध्ये फलटण येथे डॉ. प्रसाद जोशी आणि त्यांचे बंधू डॉ. प्रसन्न जोशी यांना संयुक्तपणे ‘परशुराम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित सोहळ्यात डॉ. जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. रुग्णांना आधुनिक उपचार उपलब्ध करून देणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न करणे, कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणे आणि समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, या विविध पैलूंमधून त्यांच्या कार्याची ओळख समोर येते. रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटलेले हास्य, चालण्याच्या क्षमतेतून मिळालेला आत्मविश्वास आणि डॉक्टरांविषयी मनापासून व्यक्त होणारी कृतज्ञता हीच त्यांच्या रुग्णसेवेची खरी कमाई म्हणता येईल. वाढदिवसानिमित्त डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पत्रकार सागर चव्हाण,

लोकशाही भारत न्यूज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!