फलटण – बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे उपस्थित होते.
बैठकीत शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक उपस्थित होते. यावेळी बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध सूचनाही देण्यात आल्या.
समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अफवा पसरविणारी किंवा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डीवायएसपी श्री. विशाल खांबे यांनी दिला. त्यासोबतच कुठेही गोवंश हत्या आढळून आल्यास गोरक्षकांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः कारवाई न करता पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून योग्य कारवाई करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कोणत्याही प्रकारचे चुकीचे संदेश, व्हिडिओ अथवा पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच बकरी ईद निमित्त तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना चालविण्यासाठी नगरपालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उघड्यावर जनावरांची कत्तल अथवा अवैध कत्तल आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
यावेळी ॲड. संदीप कांबळे यांनी फलटण शहरातील सीसीटीव्ही फुटेज दुरुस्ती करून घेण्यात यावी, तसेच कत्तलखाना परिसरात देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी केली. बानगंगा नदीच्या पात्रात जनावरांच्या कत्तलीनंतर हाडे टाकली जात असल्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच अक्षय तावरे यांनी फलटणमधील शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली. कुरेशी मोहल्ल्यातील नागरिकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून इतर व्यवसायांकडे वळावे, यासाठी समाज प्रबोधन करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली.
यावर सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांनी प्रशासनाला सूचना केली की, फलटण-कोरेगावचे आमदार, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन समिती स्थापन करण्यात यावी आणि कुरेशी बांधवांसाठी पर्यायी व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. फलटणला ऐतिहासिक परंपरा असून हिंदू व मुस्लिम समाज येथे एकोप्याने राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी संबंधितांना BNSS कलम 168 अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या असून परिस्थितीवर पोलीस प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांनी दिली.
बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क – डीवायएसपी विशाल खांबे
By Team LBNN
On: May 25, 2026 6:37 PM












