बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; २३ उमेदवार रिंगणात
बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर इंडियन नॅशनल काँग्रेस (काँग्रेस) पक्षाने माघार घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयामागे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची फोनद्वारे केलेली विनंती, तसेच आमदार रोहित पवार यांची प्रत्यक्ष भेट कारणीभूत ठरल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनांचाही उल्लेख करण्यात आला. दरम्यान, पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर सपकाळ यांनी टीकाही केली.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हालचाली घडल्या. एकूण ५३ उमेदवारांपैकी ३० जणांनी अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही माघार घेतल्याने आता केवळ २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, तर त्याआधी गुरुवारी ६ जणांनी माघार घेतली होती.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा यांचे अर्ज कायम राहिले आहेत. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी हे दोघेही बारामतीत अनुपस्थित राहिल्याने त्यांचे अर्ज वैध राहिले. आता २३ उमेदवारांसह ही लढत रंगणार असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.









