फलटण : फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात सार्वजनिक पाण्याची टाकी (हौद) ते एरंडे घराच्या बाजूने नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे तसेच सिमेंट काँक्रीट रस्ता करण्याचे महत्त्वपूर्ण विकासकाम नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आले असून सदर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा मिळावा आणि रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, या उद्देशाने हे काम प्रामाणिकपणे राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र, नागरिकांच्या हिताचे असलेल्या या लोकोपयोगी विकासकामात काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी केला आहे. या भागातील काही स्वयंघोषित समाजसेवक तसेच काही पगारदार कार्यकर्ते राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी व माजी नगरसेवक अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
“नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या विकासकामांत राजकारण आणणे अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेच्या हिताच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ दिला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
या सर्व राजकीय अडथळ्यांवर मात करून नागरिकांच्या आग्रही मागणीनुसार हे काम पूर्णत्वास नेले जाईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांच्या सहकार्याने हे प्रलंबित काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शहराच्या आणि प्रभागाच्या विकासाशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यापुढे विकासकामांत अडथळे निर्माण करणाऱ्यांना ‘जशास तसे’ सडेतोड उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशाराही नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिला आहे.
दरम्यान, या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अनेकांनी या कामाचे स्वागत केले आहे. अशी माहिती माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली आहे.
विकासकामांत राजकारण आणणाऱ्या ‘त्या’ स्वयंघोषित समाजसेवकांचा डाव हाणून पाडणार : नगरसेविका कु. सिद्धाली शहा
By Team LBNN
On: May 17, 2026 9:27 PM












