फलटण – फलटण वनपरिक्षेत्रातील फॉरेस्ट ऑफिस कार्यालयाच्या परिसरातील राखीव वनकक्ष क्र. 775 मधील सुमारे 1.50 हेक्टर क्षेत्रावर पूर्वी करण्यात आलेली ग्लिरिसिडिया या विदेशी प्रजातीची लागवड वन विभागाकडून हटविण्यात आली असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात वन विभागाने अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, भारत सरकारने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्याच्या कार्यआयोजनेनुसार सन 2023-24 ते 2032-33 या कालावधीत विदेशी प्रजातींचे प्रमाण कमी करून देशी प्रजातींना प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार संबंधित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या ग्लिरिसिडिया या विदेशी प्रजातीमुळे स्थानिक देशी झाडांना व जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याने त्याचे उच्चाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याअंतर्गत कुप क्र. 3 मध्ये एकूण 632 ग्लिरिसिडिया झाडे शास्त्रोक्त पद्धतीने मोजमाप करून मुळासकट काढण्यात आली आहेत. येत्या पावसाळ्यात या जागेवर सुमारे 45,000 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, यात आंबा, पिंपळ, वड, करंज, चिंच, आवळा, खैर, बाहवा आदी प्रजातींचा समावेश असेल.
वन विभागाच्या मते, या उपक्रमामुळे संबंधित क्षेत्रातील जैवविविधता वाढण्यास मदत होणार असून, शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाल्याने कार्बन शोषण वाढून प्रदूषण कमी करण्यासही हातभार लागणार आहे. तसेच या ठिकाणी ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्याचाही मानस असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित कारवाई ही भारत सरकारच्या मंजूर कार्यआयोजनेनुसार करण्यात आलेली असून, यामध्ये कोणतीही अनियमितता झालेली नसल्याचा दावा वन विभागाने केला आहे. अशी माहिती फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
फलटणमध्ये विदेशी ‘ग्लिरिसिडिया’ हटवून 45,000 देशी वृक्ष लागवडीचा निर्णय; वन विभागाचे अखेर स्पष्टीकरण
By Team LBNN
On: April 24, 2026 4:18 PM








