सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

झाडे वाचवा; पण पालखी मार्गातील अतिक्रमण हटवा!

On: May 23, 2026 9:22 AM
Follow Us:

फलटण | फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून गजानन चौक येथील शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या वटवृक्षांची तोड होणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. यानंतर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत झाडांची पाहणी केली.

यावेळी काही वृक्षप्रेमींनी “गोळी खाऊ पण झाड तोडू देणार नाही” असा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपण फक्त पाहणीसाठी आलो असून झाड तोडण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, वाईल्ड लाईफ व वृक्षप्रेमी संघटनांनी फलटण नगरपालिकेला निवेदन देत ही झाडे तोडू नयेत अशी मागणी केली आहे. या झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी व अधिवास असल्याने पर्यावरण संतुलनासाठी ती महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी देवस्थानच्या विश्वस्तांनाही याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याशी संपर्क साधून झाडे तोडू नयेत, धोकादायक फांद्या असल्यास छाटणी करावी पण मोठे वटवृक्ष वाचवावेत अशी विनंती केली.

त्यानंतरही झाडे तोडली जाणार असल्याची चर्चा पुन्हा रंगल्याने गजानन चौकात वृक्षप्रेमी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे झाडांची कोणतीही छाटणी करण्यात आली नाही.

दरम्यान, फलटणकरांच्या मनातून आता एकच आवाज उमटत आहे — “झाडे वाचवा; पण पालखी मार्गातील अतिक्रमण हटवा!”

कोट्यवधी रुपये खर्चून उभारला जाणारा अंतर्गत पालखी मार्ग अतिक्रमण हटवल्याशिवाय पूर्णतः विकसित होणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः अंतर्गत पालखी मार्गामध्ये येणाऱ्या गिरवी नाका परिसरात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यामध्ये डिव्हायडर उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पर्यावरण संतुलनासाठी शहरात मोठ्या प्रमाणात देशी व वटवृक्षासारख्या मोठ्या झाडांची लागवड करण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

हे ही वाचा  फलटणमध्ये विदेशी ‘ग्लिरिसिडिया’ हटवून 45,000 देशी वृक्ष लागवडीचा निर्णय; वन विभागाचे अखेर स्पष्टीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!