फलटण – फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण तालुका शोकमग्न झाला आहे. घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबप्रमुखाला वाचविण्याच्या प्रयत्नात आणखी तिघांनाही विजेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, खामगाव येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ राहणारे शिंदे कुटुंब बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे घराबाहेर आले होते. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक प्रवाह आल्याने पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी पत्नी गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), मुलगा सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि मुलगी आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
घराबाहेरील विद्युत वायरमध्ये प्रवाह कसा आला, तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खामगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घराबाहेरील विद्युत प्रवाह ठरला जीवघेणा; काही क्षणांत शिंदे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू
By Team LBNN
On: July 8, 2026 10:38 AM












