फलटण : प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लाकूड कापायच्या मशीनने तुकडे करून काही अवयव नदीत फेकण्यात आले, तर उर्वरित मृतदेह शेतात पुरण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील सतीश ऊर्फ आप्पा दादासो दडस हे १४ जानेवारी २०२५ रोजी बेपत्ता झाले होते. त्याबाबत त्यांचे भाऊ सागर दादासो दडस यांनी बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. विडणी परिसरात शोध घेऊनही सतीशचा थांगपत्ता लागला नव्हता.
दरम्यान, तपासादरम्यान प्रेमसंबंधातून हा खून झाल्याची माहिती उघड झाली. १४ जानेवारी रोजी दुपारी सतीश दडस याचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत वाद झाला. या वादातून संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.
यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेण्यात आले. पुढे फलटण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी परिसरात पुन्हा त्याच्या डोक्यात दगड घालून निघृण मारहाण करण्यात आली, ज्यात सतीशचा मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह लाकूड कापायच्या मशीनने तुकडे केला. मृतदेहाचे मुंडके, हात व पाय वेगळे करून काही अवयव निरा नदीत फेकण्यात आले, तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला, अशी कबुली संशयितांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात लखन बंडू बुधवाले, सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुधवाले यांचा थेट सहभाग असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला
By Team LBNN
On: January 23, 2026 11:34 AM
---Advertisement---









