
फलटण : फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी व विरोधी गटातील सर्व नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.
सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रारंभी नगरसेवक विकास काकडे यांनी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शासन निर्णयांची माहिती देण्याची मागणी केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी सर्व विषयांची नोंद मिनिट्स बुकमध्ये होत असल्याचे स्पष्ट केले.
सभेत एकूण ४६ विषयांवर चर्चा झाली. सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या वार्षिक निविदा मागविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतील कामांवर चर्चा करताना काही प्रभागांमध्ये कमी कामे झाल्याची तक्रार मांडण्यात आली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील कामांवर चर्चा झाली. “नमो उद्यान” उभारणीसंदर्भात वन विभागाच्या जागेचा विचार करण्याची सूचना करण्यात आली. पेठ मंगळवार येथील बुद्ध विहार दुरुस्तीचा विषय सर्वानुमते मंजूर झाला.
शहर विकास आराखड्याविषयी चर्चा करताना झोपडपट्टी भागालाही निधी देण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांनी शहरातील सर्व रस्ते सहा महिन्यांत सुधारण्याचे आश्वासन दिले.
नगरपरिषदेच्या कामांना मुदतवाढ देताना निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, ज्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नगरपरिषद इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव. या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी गटात जोरदार चर्चा झाली. अखेरीस हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
तसेच, सोमवार पेठेतील श्री फिरंगाई देवी मंदिर परिसराला “फिरंगाई नगर” असे नामकरण करण्याचा ठरावही मंजूर झाला.( श्री फिरंगाई देवी मंदिर परिसर हा बहुतांश क्रांतिसिंह नाना पाटील हाउसिंग सोसायटीचा आहे )
यासोबतच फिरंगाई देवी, महादेव व भैरवनाथ यात्रांसाठी नगरपरिषदेच्या वतीने खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीचा प्रस्तावही मतदानाद्वारे मंजूर झाला. शहर हद्दवाढ, जाधववाडीचा समावेश, फरांदवाडी येथे स्टेडियम उभारणी, जमीन खरेदी, मनुष्यबळ उपलब्धता, दिव्यांग निधी वितरण आदी विषयांवरही चर्चा झाली.
वीज विभागासोबतचा करार स्थगित ठेवण्यात आला. नवीन विद्युत पोल, दुहेरी लेखा पद्धती, अण्णाभाऊ साठे योजनेतील नवीन कामे आणि मालमत्ता कर अभय योजना याबाबत निर्णय घेण्यात आले.
पाणीपुरवठा कामातील त्रुटींवरून समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरातील शौचालय बांधकाम, भुयारी गटार योजना, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक नेमणूक, बाजार व्यवस्थापन, गाळ्यांचे जप्ती व फेरलिलाव, स्विमिंग पूल भाडेतत्त्वावर देणे अशा अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले.
सभेच्या शेवटी ध्वनीप्रणालीबाबत तक्रार मांडण्यात आली असून पुढील बैठकीत सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
एकूणच, शहर विकास व प्रशासनिक सुधारणा यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरली असून बहुतेक सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.








