सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

On: May 4, 2026 6:03 PM
Follow Us:

फलटण – फलटण येथे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त ५६ वा अंतरधर्मीय मोफत सत्यशोधक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रा. अॅड. करिष्मा मुलाणी आणि प्रा. श्रेयस कांबळे यांनी साध्या व संविधानिक पद्धतीने विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
हा विवाह सोहळा जाधववाडी येथील अक्षत रेसिडेन्सी येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मोजक्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. विवाहाची अधिकृत नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी करण्यात आले. सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी विधी संपन्न करून नवदांपत्याला सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पारंपरिक पद्धतीतील अक्षतांच्या ऐवजी सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे पर्यावरणपूरक व साधेपणाचा संदेश देण्यात आला.
विवाह सोहळ्याची सुरुवात नवदांपत्याने भारतीय राज्यघटना व समग्र वाङ्मय हातात घेऊन आगमनाने झाली. त्यानंतर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थितांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ व गुलाबाचे रोप भेट देण्यात आले.
या प्रसंगी प्रा. श्रेयस कांबळे व प्रा. करिष्मा मुलाणी यांनी शपथपत्र वाचन करून समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच निर्भय व सत्यशोधक समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी करिष्मा मुलाणी यांनी ‘तयास मानव म्हणावे का’ ही कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले, तर कांबळे कुटुंबीयांनी काव्य सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या सोहळ्यास पत्रकार विकास शिंदे, पत्रकार जयदीप भगत, ज्येष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विजय आमने, लॉ कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवदांपत्याचे अभिनंदन करत त्यांच्या प्रगत आणि कृतीशील विचारसरणीचे कौतुक केले.

हे ही वाचा  पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!