फलटण : फलटण शहरातील समर्पित, सहानुभूतीपूर्ण आणि प्रगत ऑर्थोपेडिक सेवा देणारे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना पुणे येथे प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे फलटणमधील गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या आरोग्यसेवेला राज्यस्तरावर विशेष दखल मिळाली आहे.
ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लोकमत, पुण्याचे मुख्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी डॉ. जोशी यांच्या वैद्यकीय सेवेचे तसेच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे विशेष कौतुक केले.
डॉ. प्रसाद जोशी हे गेल्या अनेक वर्षांपासून फलटण परिसरात रुग्णांना आधुनिक, विश्वासार्ह आणि परवडणारी ऑर्थोपेडिक सेवा देत आहेत. अल्प खर्चात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना त्याचा मोठा लाभ झाला आहे.
दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन करणारी ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणीय परिसंस्था व्यवस्थापन क्षेत्रात विविध पथदर्शी प्रकल्प राबवत आहे. संस्थेने भारताचे नॉर्वेमध्ये प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली असून, संस्थेचे श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले अहिवळे यांच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रसाद जोशी यांनी ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि., श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले अहिवळे यांचे आभार मानले. हा सन्मान समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेची दखल; डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’
By Team LBNN
On: May 27, 2026 7:51 PM










