फलटण : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेने चायनीज (नायलॉन) मांज्याच्या विक्रीविरोधात कठोर भूमिका घेतली असून, यापुढे फक्त दुकानदारांवरच नव्हे तर घरातून चायनीज (नायलॉन) मांजा विक्री करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या मांज्याच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पालिकेने कडक इशारा दिला आहे.
नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमीचा सण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. यावेळी सर्रास चायनीज (नायलॉन) मांज्याचा वापर केला जातो. या मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्षी आणि इतर प्राण्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. दरवर्षी अशा मांज्यामुळे अपघात आणि जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने पालिकेने यंदा कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
फलटण शहरातील दुकानदार, गाळेधारक तसेच घरातून पतंग व मांजा विक्री करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे चायनीज (नायलॉन) मांज्याची विक्री होताना आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच घरातून बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवरही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांनी चायनीज (नायलॉन) मांज्याची विक्री व वापर पूर्णपणे टाळावा, तसेच पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यायांचा वापर करावा, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा धडक निर्णय; चायनीज मांजा विक्री आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द, घरातून विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई होणार !
By Team LBNN
On: August 6, 2026 7:15 PM












