“गणपती बाप्पा मोरया!”
आपल्या बाप्पाचं आगमन म्हणजे आनंद, श्रद्धा, उत्साह आणि घरात आलेल्या एका जिव्हाळ्याच्या पाहुण्याचं स्वागत.तो कायम सोबत असतो पण या गणेशोत्सवात निमित्त घेऊन प्रत्येक भक्त त्याच्या स्वागतासाठी तयारी करत असतो त्यात ज्यांच्या घरात गौराई असतात तिथली लगबग तर विचारायलाच नको.बाप्पाच्या येण्याच्या काही महिन्यांपूर्वीपासूनच भव्य स्वागताची जय्यत तयारी सुरू असते…काहीजण हाताने बाप्पा साकारतात त्यात जीव ओतून मग्न होऊन या दिवसाची वाट पाहत काम करतात….
जरी जग आता पुर्वीसारखे नसले तरी आजही गणपती उत्सवातील आनंद भरभरून दिसुन येतो आणि त्याचा प्रत्यय सोशलमिडीयावरील रिल्स, व्हिडिओ बघुन येतोच.
मोठे मंडप, भव्य सजावट, आकर्षक देखावे, हजारोंची गर्दी आणि प्रसिद्ध गणपती बाप्पा च्या दर्शनासाठी तासनतास लागणाऱ्या रांगा.या भल्यामोठ्या रांगेत जायची काय गरज आहे असं जरी म्हटलं तरी श्रद्धेपुढे सारं फिकं पडतं आणि आपला माथा टेकल्याशिवाय राहत नाही.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही असंख्य भाविक तासन्तास रांगेत उभे राहतात. कुणासाठी ती रांग नवसाची आहे, कुणासाठी श्रद्धेची, तर कुणासाठी आयुष्यात एकदा तरी बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं.त्या श्रद्धेचा आणि तेथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा आदर आहेच पण एवढा वेळ बाप्पासाठी देताना एक छोटासा प्रश्न मनात डोकावतो….या बाप्पासाठी तासन्तास रांगेत उभं राहणं श्रद्धा असेल तर घरच्या बाप्पासोबत मनापासून घालवलेला वेळही भक्तीचाच भाग आहे ना…उलट माझ्यामते आपण बाप्पा घरी येतो तेव्हा जी जय्यत तयारी करतो ती तेव्हाच बाप्पापर्यंत पोहचली असते तो फक्त आपल्या भावनांचा भुकेला असतो जे आपण त्याच्यासाठी न थकता सेवा करतो ती आपल्याही नकळत त्याला अर्पण होते त्यासाठी एवढ्या मोठ्या रांगेत आपल्या जीवाला त्रास आपण देतो ते कदाचित लालबागच्या राजालाही नक्कीच बघवत नसेल.त्यालाही ती चेंगराचेंगरी,ती रांगेत भाविकांची झालेली मारामारी हे सारे नक्कीच दुखावणारे असेल…
कधी आपण विचार केला आहे का ही गर्दी एवढी आजकाल का वाढत असेल? खरच सगळीच लोक फक्त श्रद्धेपोटी दर्शनाला जात असतील का ?
खरंतर सध्या Reel, Story, Status, फोटो, Live चा जमाना दर्शन झालं की लगेच कॅमेरा आणि आपला एक फोटो मग पुन्हा Reel, Story, Status चे चक्र सुरू…
हे चुकीचच आहे असं म्हणता येणार नाही. आनंदाचे क्षण शेअर करणं हा आजच्या जीवनाचा भागच आहे.
पण यात आपण बाप्पाला मनापासून पाहायला गेलो होतो की बाप्पासोबतचा क्षण इतरांना दाखवायला? हा प्रश्न आपण सगळ्यांनी आपल्या मनाला नक्की एकदा विचारायला हवा… रांगेत बाप्पा किंवा कुठलाही देव दिसत नाही आपण नीट दर्शनही घेत नाही तोपर्यंत आपला कॅमेरा एकतर सेल्फी घ्यायला तयार असतो नाहीतर आपला कोणीतरी छान फोटो काढेल यासाठी नजर फोटो काढणार्यांना शोधत असते.आज फार कमी जण असतील जी देवदर्शनाला जाताना देवासमोर मोबाईल काढत नसतील… बरोबर ना? आपण त्या क्षणांना आपल्या मनातील आठवणीत कमी आणि फोटोमध्येच जास्त साचवायला बघतो…आपले आजीआजोबा जेव्हा त्यांच्या काळात पुर्वी कुठे फिरायला गेले असतील तर किती बारीक बारीक गोष्टी आठवून आठवून आपल्याला सांगतात ते बोलणं ऐकून आपल्यासमोर चित्र उभं राहतं इतकं त्यांच वर्णन रोमांचक असतं आणि त्यांचा तो सांगण्यातला आनंद तो वेगळा.. म्हणजे ते पुर्वीचे क्षण दोनदा अनुभवतात…पण जर आपण फक्त फोटोसाठी एवढा खटाटोप करतो पण आपण ते क्षण जगतो किती हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे… आपल्याला येईल का इतकं मनसोक्त वर्णन आपल्या नातवंडांना सांगायला निदान जे फोटो आता काढतोय तो तेव्हा सापडेल का नातवंडांना दाखवायला?…
सांगायच तात्पर्य एवढचं की,एक फोटो काढला नाही तरी बाप्पावरील श्रद्धा कमी होत नाही.एक Story टाकली नाही तरी खरच खूप काही फरक पडत नाही.
एक Reel Viral झाली नाही तरी आपली भक्ती कमी होत नाही.कारण भक्तीला Likes, Views किंवा Followers लागत नाहीत.कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून फक्त बाप्पाकडे पाहणंही आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि बाप्पालाही तेच हवं असतं तो कदाचित अशाच भक्तांची वाट बघत असतो त्यांच्याच घरात…..
आज सजावटीवर, रोषणाईवर, देखाव्यांवर मोठा खर्च होतो.
त्यात उत्सवाचा आनंद आहे, कलाकारांची मेहनत आहे, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होतो.
पण या उत्सवाच्या भव्यतेसोबत पर्यावरण, ध्वनीप्रदूषण, प्लास्टिक, कचरा आणि गर्दीतील सुरक्षितता यांचाही आपण विचार झाला पाहिजे.भक्ती फक्त चार वस्तू आणुन भव्य सजावट करणे नाही तर आपल्यामुळे आपला परिसर, आपल्या आजुबाजूची लोक शांततेत जगतील अशा कृतींचा एक भाग होणे होय.बाप्पाला मोठी सजावट आवडेल की निसर्गाची काळजी घेणारा भक्त?
मोठा आवाज आवडेल की शेजाऱ्याच्या आजारी व्यक्तीचा, वृद्धांचा आणि लहान मुलांचा विचार करणारा उत्सव?
हजारो लोकांची गर्दी जमवणं मोठेपणाचं लक्षण असेलही पण त्या गर्दीत प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता जपणं त्याहून मोठी जबाबदारी आहे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची…आपण भाविकांना आनंद देण्यासाठी या उत्सवाचा भाग बनलो आहोत जर तो भाविक त्याचा मनापासून आनंद घेऊ शकत नसेल तर तो बाप्पा या मंडळांना तरी पावेल का?
उत्सव भव्य असावा, पण संवेदनशीलही असावा तरच त्याचं पावित्र्य राखले जाते….
लालबागचा राजा असो, गावचा गणपती असो किंवा आपल्या घरातला छोटासा गणराया प्रत्येक भक्ताची श्रद्धा वेगळी आहे आणि तिचा आदर केला पाहिजे.१२-१८ तास एखाद्या रांगेत उभं राहतो तर त्याचे दर्शन किती आदराने व्हायला हवे हा मंडळांनी विचार करावा.. तुम्ही रात्री बाप्पाचे दर्शन घेऊन त्याच्या पुढ्यात दिवसभर मंडळासाठी कशी सेवा दिली यासाठी कृतज्ञता व्यक्त करालही पण तुमच्या एका चुकीमुळे/धक्काबुक्कीमुळे कुठला तरी भाविक घरी जाऊन रडत असेल आणि ते गणपती बाप्पाला नक्कीच वेदना देणारे ठरते….भाविकांनीही जर शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर आणि तरच जावे कारण स्वतःच्या शरीराला वेदना देऊन केलेले दर्शन बाप्पापर्यंत पोहचेलच असे नाही कारण देवालाच ते आवडणार नाही त्यापेक्षा स्वतःच्या घरात जरी शांत राहून गणरायाला आठवलं तरी तो ऐकतोच ….
खरंतर आपण किती मंडप फिरलो किती देवांच्या दर्शनासाठी रांगेत तासनतास उभे राहिलो यापेक्षाकिती माणसांच्या आयुष्यात आनंद दिला?
किती फोटो काढले यापेक्षा त्या क्षणीकिती आठवणी मनात जपल्या? किती Reels बनवल्या यापेक्षाबाप्पाचे किती गुण आपल्या आयुष्यात आणले?यंदाच्या गणेशोत्सवात एवढंच करूयात….
बाप्पालाही हेच जास्त आवडेल..!!
गणपती बाप्पा मोरया!मंगलमूर्ती मोरया!
टिप- कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही एक बाप्पा भक्त म्हणून जे सुचलं ते मांडण्याचा प्रयत्न…
-क्रांती शेलार, नाशिक
बाप्पा कुठे हरवला?
गर्दीत, दिखाव्यात की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर?
By Team LBNN
On: September 24, 2026 11:38 AM












