राजघराण्यातील मान्यवरांसह राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
फलटण : मैत्रीपूर्ण संबंधातून तयार झालेल्या फलटणमधील आरडी ग्रुप फाउंडेशनच्या वतीने आज मंगळवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी ७ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक, यशवंतराव चव्हाण हायस्कूलसमोरील मैदानावर भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आरडी ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक श्री. राहुल पवार हे फलटणमधील नाईक निंबाळकर राजघराण्याशी सोबत असून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाकडे फलटण शहरासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या उत्सवासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, शिवसेनेचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीची रंगत वाढणार आहे.
डबल महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांची संभाव्य उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीचीही चर्चा असल्याने या दहीहंडी उत्सवाकडे फलटणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आरडी ग्रुप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला डबल महाराष्ट्र केसरीसह साताऱ्याचे पालकमंत्री उपस्थिती लावणार?
By Team LBNN
On: September 8, 2026 7:32 AM












