भाजपच्या राजकीय हेतूंना विरोध करण्यासाठी आंदोलनाची भूमिका — प्रा. सुकुमार कांबळे
कोल्हापूर – डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (DPI) महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी कोल्हापूर येथे केली. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी झालेल्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा विषय राज्यात चर्चेत असून, या मुद्द्यावर भाजप राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. भाजपप्रणीत नेत्यांच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील मोठा वर्ग आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे DPI ने म्हटले असून, हा लढा सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून लढवला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रा. कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक धोरणांचा संदर्भ देत सांगितले की, आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचलेला नाही. अनुसूचित जातींतील अनेक समाजघटक गेल्या ७५ वर्षांतही आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. होलार,मांग-गोरडी, डक्कलवार यांसारख्या समाजांना प्रतिनिधित्व आणि संधी मिळण्यासाठी उपवर्गीकरण गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
शाहू महाराजांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती करून शिक्षणाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवली. त्याच धर्तीवर अनुसूचित जातींमध्येही समान संधी मिळण्यासाठी उपवर्गीकरणाची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
यावेळी राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, राज्य प्रवक्ते सुभाष लोनके, सांगली जिल्हाध्यक्ष दादासाहेब कस्तुरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विलास लोंढे, सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे, पृथ्वी मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ लोनके उपस्थित होते. बैठकीचे नियोजन लालासाहेब नाईक यांनी केले.








