फलटण – प्रबुद्ध विद्या भवन या प्राथमिक शाळेत तब्बल 23 वर्षांपूर्वी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकत्र शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी नुकतेच स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याने विद्यार्थी, शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या वेळी शाळेचे संस्थापक मा. दत्ता अहिवळे सर यांनी शाळा उभी करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची आठवण सांगितली. “या शाळेतून घडलेले विद्यार्थी हीच आमच्या कामाची खरी पोचपावती आहे,” असे ते म्हणाले.
गुंजवटे सर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांसोबत घालवलेले क्षण पुन्हा जिवंत केले. तर यशवंत कारंडे सर यांनी एवढ्या वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम आणि सन्मान पाहून भावना व्यक्त केल्या. “अशा प्रकारे आमचे स्वागत होईल असे कधी वाटले नव्हते,” असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. कांबळे मॅडम देखील विद्यार्थ्यांना पाहून भावुक झाल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक्षा अहिवळे आणि प्रिया काकडे यांनी विशेष मेहनत घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींना शोधून पुन्हा एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा छोटेखानी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. गुरु-शिष्यांच्या या भावनिक भेटीमुळे अनेकांचे डोळे पाणावले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुने किस्से, मधल्या सुट्टीतील खेळ आणि शिक्षकांनी दिलेली शिस्त यांची आठवण काढत जुन्या दिवसांना उजाळा दिला.
या सोहळ्याने केवळ जुने मित्रच एकत्र आले नाहीत, तर भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे सुंदर दर्शन घडवले.
कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रतीक्षा अहिवळे व प्रिया काकडे यांचे सर्वांनी कौतुक केले.
यावेळी प्रशांत अहिवळे, कुणाल अहिवळे, गणेश अहिवळे, सूर्यकांत भोसले, गणेश काकडे, सुजित अहिवळे, प्रिया काकडे, प्रतीक्षा अहिवळे, प्रतीक्षा काकडे, पूजा ढावरे, संगीता खरात यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.









