सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फक्त पेपर फुटत नाही तर एक व्यवस्थाच डळमळीत होते,
लाखो होतकरू तरुण-तरूणींच्या स्वप्नांचाही खुन होतो……

On: September 16, 2026 1:47 PM
Follow Us:

  रात्रीचे दोन वाजले होते.एका छोट्याशा खोलीत टेबलावर पुस्तकांचा ढीग होता. भिंतीवर वेळापत्रक चिकटवलेलं. डोळे लाल झालेले पण योगेश अजूनही अभ्यासच करतोय.
कारण उद्या परीक्षा आहे.त्याची आई दोनदा खोलीत डोकावून गेली. पहिल्यांदा म्हणाली, ”झोप आता,सकाळी लवकर उठायचं आहे.”
योगेश म्हणतो, ”आता फक्त दोन टॉपिक राहिलेत आई.”
आई पुन्हा काही न बोलता बाहेर जाते.तिला माहीत होते आपला मुलगा फक्त दोन टॉपिक पूर्ण करत नाहीये तर तो त्याचं व आपलं भविष्य सुरक्षित करण्याचा पुर्ण प्रयत्न करतोय.
या एका परीक्षेसाठी त्याने महिनोन्महिने अभ्यास केला होता कित्येक उमेदीचे वर्षे त्याची यात गेली होती. वडिलांनी शक्य तेवढे पैसे जमवले फक्त त्याने चांगला अभ्यास करून मोठा अधिकारी व्हावा म्हणून. आईने स्वतःच्या अनेक गरजा पुढे ढकलल्या होत्या पोराच्या स्वप्नांसाठी.योगेशनेही कमी त्याग नव्हता केला त्याने मित्रांचे कार्यक्रम टाळले. सणांच्या सुट्ट्या टाळल्या तेव्हाही तो आजुबाजुच्यांचे, नातेवाईकांचे टोमणे ऐकूनही अभ्यास करायचा.कधी कधी तर  स्वतःच्या आवडी बाजूला ठेवल्या.कारण त्याला विश्वास आहे “मी मेहनत केली तर मला माझी संधी नक्की मिळेल.”
पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक बातमी येते “प्रश्नपत्रिका फुटली. परीक्षा रद्द.” ज्या परिक्षेसाठी योगेशने एवढे वर्षे जीव तोडून मेहनत केली होती त्या परिक्षेची उत्तरपत्रिका अशी बाहेर फुटून किती बघितलेल्या एकेका स्वप्नांचा जीव गेला असेल तोही एका क्षणांत….
    अहो फक्त एक परीक्षा रद्द होत नाही. एक पेपर फुटत नाही त्यासाठी मेहनत करणार्या लाखो स्वप्नांचा खुन होतो ज्याच्या रक्ताच्या थारोळ्यात कोणी दुसरा रडूच शकत नाही कारण ते दुःख फक्त ज्याने जीवतोडून अभ्यास केलेला असतो तोच जाणून असतो.एका मेहनती विद्यार्थ्याच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीला पुन्हा शून्यावर पाठवलं जातं आणि दुसरीकडे आपण ज्यांचा या स्पर्धा परिक्षांशी काही संबंध नसतो ,सकाळी मोबाईल उघडतो.समोर पेपरफुटीची बातमी दिसते.दोन मिनिटं कुठंतरी  संतापतो.
काही कमेंट्स करतो.”हे थांबायला हवं.”,”दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.” तीही केली किंवा वाटली तरच नाहीतर  पुढच्या बातमीकडे वळतो.आपल्यासाठी तो विषय समोर असेपर्यंतच गंभीर असतो त्यापलिकडे आपल्याला त्यातले गांभीर्य नसतेच(अपवाद असतील पण फारच कमी).
पण त्या विद्यार्थ्यांचं काय? एवढं सगळं झाल्यावरही त्यांचं पुस्तक बंद होत नाही.त्यांची चिंता संपत नाही.त्यांचा खर्च थांबत नाही.त्यांचं वाढणारं वय थांबत नाही कारण एवढे वर्षे फक्त अभ्यास करून बाहेर दुसरी नोकरी कोण देणारं?
आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मनातला व्यवस्थेवरील विश्वास परत येत नाही पण तरी मान खाली घालून पुन्हा अभ्यास करावाच लागतो कारण पर्यायच नाही.
त्याला पुन्हा त्याच परीक्षेची तयारी करावी लागते.
पुन्हा त्याच अभ्यासक्रमातून जावं लागतं.
पुन्हा तीच भीती. परत पेपर फुटला तर, पुन्हा परीक्षा रद्द झाली तर………………
एखाद्या देशाच्या तरुणाने आपल्या परीक्षेच्या सुरक्षिततेवरच प्रश्न विचारावा, त्याच टेन्शनमध्ये राहून अभ्यास करावा यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं?
आपण एखाद्या परिक्षेची किंमत साधारणपणे “परीक्षा रद्द झाली” इतकीच मोजतो पण खरी किंमत त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे.यातील दाहकता खुप खोल आहे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी.
यात एका विद्यार्थ्याचा वेळ जातो.एका कुटुंबाचा पैसा जातो.पालकांचा पाल्याच्या भविष्यावरील विश्वास ढासळतो.विद्यार्थ्याची मानसिक शांतता जाते.
कधी कधी जर आधी कधीच नोकरी केली नसेल तर त्याची इतर नोकरीची संधीही जाते आणि काहींच्या बाबतीत तर आयुष्यातील एक महत्त्वाची संधीच निघून जाते.
कारण प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती सारखी नसते.
एखादा विद्यार्थी एक वर्ष पुन्हा देऊ शकतो.
पण दुसऱ्यासाठी ते एक वर्ष म्हणजे घरचा खर्च, कर्ज, वयाची मर्यादा, कौटुंबिक जबाबदारी किंवा नोकरीची गरज असू शकते म्हणूनच “परीक्षा पुन्हा घेऊ” हे प्रशासनासाठी एक निर्णय असू शकतो पण विद्यार्थ्यासाठी ते अनेकदा आयुष्य पुन्हा एकदा थांबवणं, जे ठरवलं आहे त्यात पुन्हा शुन्यातून जाणं असतं. हे झालं एका विद्यार्थ्याविषयी विचार करा असे लाखोंच्या संख्येने रोज नवे चेहरे असतील.त्यात विवाहित, अविवाहित मुलींचातर विषय दुरवर नाही.एका मुलीला किती टोमण्यांतून जावे लागते,लग्न कधी करणार,वय वाढत चाललंय,बस्स झालं आता लागा संसाराला ,तिच्याच विवाहित इतर मैत्रिणीही ईर्षा धरून तिला मानसिक दबाव टाकणार ते वेगळं..तेच विवाहित स्त्री तिची बिचारीची व्यथा निराळी.जर अभ्यास करून काही साध्य झालं तर ठिक नाहीतर आहेच सासु- सासरे- दिर-ननंद यांची ती वैरीण होऊन बसते एका ठराविक वेळेनंतर सासरच्या लोकांना विशेषतः नवर्यालासुद्धा(जर समजुन घेणारा नसला तर) ती डोईजड होऊन बसते फक्त एका परिक्षेमुळे त्यात हि पेपरफुटी अजुन आग लावून जाते ते वेगळे…
यात ज्याने परिक्षेत गैरप्रकार केला त्याच्यावर कारवाई होईल पण ज्याने काहीही चुकीचं केलं नाही त्याचं काय?
ज्याने रात्रंदिवस अभ्यास केला,ज्याने कोणाकडून पेपर मागितला नाही फक्त आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे स्वप्न बघितले,ज्याने पैसे देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतली नाही,ज्याने फक्त स्वतःच्या बुद्धीवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवला.त्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागते बाकी आपली न्यायव्यवस्था किती वेळखाऊ प्रक्रियेतून जाते हे सांगायची येथे गरज नाही.त्यातही हे गुन्हेगार यांना शिक्षा मिळेलच याची शाश्वती नाही पण त्या निरागस लोकांचं काय जे या पेपरफुटीच्या आगीत आपल्या स्वप्नांची हत्या होतांना बघत आहेत..काहींनी तर आत्महत्या केली यामुळे नैराश्य येऊन.यांंना कसा मानसिक आधार देणार आपण??
इथेच पेपरफुटीचा सर्वात मोठा अन्याय दडलेला आहे.
गैरप्रकार करणारा काही काळासाठी फायदा मिळवतो.
पण प्रामाणिक विद्यार्थी त्याची किंमत चुकवतो.
ही परिस्थिती बदलली नाही तर आपण तरुणांना कोणता संदेश देतोय?”प्रामाणिकपणे मेहनत करा” की ”व्यवस्था चुकवण्याचा मार्ग शोधा”? यात फक्त प्रामाणिक विद्यार्थी बळी पडतोय!!!
एखाद्या मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा त्याच्यासोबत संपूर्ण घर तयारी करत असतं.घरातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवस त्या स्वप्नांना मनात घेऊन जगत असतो.
वडील म्हणतात”तू अभ्यास कर, पैशांची काळजी करू नकोस.”पण त्या वाक्यामागे वडिलांनी घेतलेलं कर्ज असतं ज्याची झळ फक्त त्या बिचाऱ्या बापाला लागते.
आई म्हणते”तुला जे पुस्तक हवंय ते घे.”
पण त्या पुस्तकाच्या पैशासाठी तिने स्वतःची एखादी गरज पुढे ढकललेली असते कारण तिला माहित असतं जर आपला मुलगा/मुलगी मोठे झाले तर आपले हे वाईट दिवसही निघून जातील.
काही ठिकाणी बरेच मुल-मुली शहरात राहतात म्हणजेच दिल्ली,पुणे, मुंबई वगैरे मोठ्या शहरांमध्ये.(यात मी फक्त मेहनत करणार्या मुला-मुलींबिषयी सांगत आहे बाकी मजा करणार्या स्पर्धा परीक्षा करणार्या मुला -मुलींचा विषय वेगळा जो कुटूंबासाठी गंभीर आहे)
त्यांच्या घरातून फोन येतो”अभ्यास कसा चाललाय?”
आणि तो प्रत्येक वेळी एकच उत्तर देतो”चाललाय, यावेळी नक्की होईल.”त्या “नक्की होईल” मध्ये एका संपूर्ण कुटुंबाची आशा असते आणि जेव्हा पेपरफुटी होते तेव्हा फक्त विद्यार्थ्याचा अभ्यास वाया जात नाही.त्या कुटुंबाच्या आशेवरही आघात होतो.कल्पना केली तरी अंगावर काटा येऊन जातो किती भयंकर अवस्था होत असेल कुटुंबाची आणि त्या मेहनती विद्यार्थ्यांची….
तरुण पिढीला आपण सतत सांगतो मेहनत करा,
शॉर्टकट वापरू नका,प्रामाणिक राहा.पण त्याच तरुणाने जर वारंवार पाहिलं की गैरप्रकार करणारे लोक संधी मिळवतात आणि प्रामाणिक विद्यार्थी पुन्हा-पुन्हा परीक्षा देत राहतात, तर त्याच्या मनात प्रश्न निर्माण होणारच.”मग माझ्या मेहनतीची किंमत काय?”हा प्रश्न अत्यंत धोकादायक आहे.कारण त्याने आजुबाजुला ज्यांना मेहनत माहिती नसते,सगळं आयुष्य मजा करून घालवलं असतं अशांना सिलेक्ट झालेलं बघितलेलं असतं असे आपल्याही आजूबाजूला बरेच आहेत ज्यांच्या अधिकारी होण्यावर आपण शंका उपस्थित करू शकु… बरोबर ना?
कारण देश फक्त रस्ते, इमारती आणि तंत्रज्ञानाने मोठा होत नाही.देश मोठा होतो तो आपल्या तरुणांच्या व्यवस्थेवरील विश्वासानेआणि एकदा का हा विश्वास तुटला तर त्याची दुरुस्ती एका समितीने किंवा एका चौकशी अहवालाने कधीच होत नाही मग क्रांतीला पर्याय उरत नाही.
खरंतर स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ प्रश्नांची उत्तरं लिहिण्याची प्रक्रिया नाही .त्या माध्यमातून उद्याचे अधिकारी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील जबाबदार व्यक्ती निवडल्या जातात.
म्हणून निवड प्रक्रियाच जर संशयाच्या भोवऱ्यात आली तर त्याचे परिणाम परीक्षागृहाच्या बाहेरही जाणार आहेत.
आपण उद्या व्यवस्थेची जबाबदारी कोणाच्या हातात देतोय?
मेहनतीने पात्र ठरलेल्या व्यक्तीच्या? की गैरप्रकारातून पुढे आलेल्या व्यक्तीच्या?
हा प्रश्न गंभीर आहे.
कारण चुकीच्या पद्धतीने मिळवलेली एक जागा म्हणजे फक्त एका प्रामाणिक विद्यार्थ्याची जागा हिरावून घेणे नाही.
ती भविष्यातील व्यवस्थेत चुकीच्या व्यक्तीला पोहोचण्याची शक्यता निर्माण करते.
आत फक्त दोषींना अटक करून हा प्रश्न संपणार नाही.
कारवाई कठोर असलीच पाहिजे; पण त्यासोबत परीक्षा व्यवस्थेत मूलभूत बदल आवश्यक आहेत.
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत तिची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा अत्यंत कडक असली पाहिजे.प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
गैरप्रकार आढळल्यास जलद आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. अहो आपण परिक्षा केंद्रावर साधी पाण्याची रंगीत बाटली घेऊन जाऊ देत नाही विद्यार्थ्यांना मग येथे इतकी निष्काळजीपणा का जो पेपर मुलांचं भविष्य साकारतो तिथे इतकी निष्क्रीयता का??…
दोष सिद्ध झाल्यास केवळ तात्पुरती शिक्षा नव्हे तर भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल अशी कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं
प्रामाणिक विद्यार्थ्याला झालेल्या नुकसानीची दखल घेतली पाहिजे.परीक्षा पुन्हा घेणे हा उपाय आहे.
पण त्याने विद्यार्थ्याला झालेला वेळ, पैसा, मानसिक ताण आणि संधीचा तोटा पूर्णपणे भरून निघत नाही याचा सुद्धा विचार एकदा व्हायला हवाच.नाहीतर वेळ निघून जाईल आणि आपल्याला लाखो होतकरू तरुण-तरूणी एकेक करून पंख्याला लटकलेले दिसतील..ज्यांची योग्य जागा प्रशासकीय सेवेत आहे त्यांच्या आयुष्याला असं खितपत पडु देऊ नका हीच व्यवस्थेला विनंती..
आपण आपल्या मुलांना नेमका कोणता देश देतोय? कशा देशासाठी तयार करतोय याचा विचार नक्कीच व्हावा कारण आज आपण जगतोय त्याच्या मागे मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासातील प्रत्येक व्यक्तीच्या त्यागाचा परिणाम आपल्या भविष्यातील भारत घडवण्यासाठी असावा एवढचं…..
— क्रांती ज्ञानेश्वर शेलार, नाशिक
९१५८३८५६९०

हे ही वाचा  प्रबुद्ध विद्या भवनचे 23 वर्षांनंतर जुने विद्यार्थी एकत्र; गुरु-शिष्यांच्या भेटीने शिक्षक आणि माजी विद्यार्थी झाले भावुक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!