३० मे… एका प्रेरणादायी, कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन. शिक्षण क्षेत्रात आपल्या अथक परिश्रम, उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या समर्पित भावनेतून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी व्यवस्थापकीय संचालिका आदरणीय सौ. संध्या विकास गायकवाड (मॅडम )यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि यशस्वी जीवनप्रवासाचा घेतलेला हा विशेष शब्दांकित आढावा.
कुठलीही मोठी उंची गाठण्यासाठी संघर्षाची वाट चालावी लागते. संकटे, अडचणी आणि आव्हाने ही यशाच्या मार्गातील अपरिहार्य पायऱ्या असतात. मात्र ध्येय स्पष्ट असेल, जिद्द प्रबळ असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल, तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही. सौ. संध्या गायकवाड मॅडम यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा याच विचारांचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळे आणि समाजोपयोगी कार्य करण्याच्या ध्यासातून त्यांनी सरस्वती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सन २००८ मध्ये अवघ्या २६ विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलने आज प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे. आज ही संस्था प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या नावाने परिसरातील एक गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जाते.
या यशस्वी प्रवासामागे संध्या मॅडम यांची दूरदृष्टी, अथक परिश्रम, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली अपार तळमळ हे प्रमुख घटक आहेत. सुरुवातीच्या काळात आर्थिक, प्रशासकीय आणि विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जाताना त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करत त्यांनी संस्थेची वाटचाल यशाच्या दिशेने सुरू ठेवली. या प्रवासात त्यांचे पती श्री. विकास गायकवाड आणि बंधू श्री. विशाल पवार यांची मोलाची साथ लाभली.
स्वतः एक आदर्श शिक्षिका असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा, त्यांच्या क्षमता आणि शिक्षणातील बदलते प्रवाह यांची त्यांना उत्तम जाण आहे. शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले.
बौद्धिक स्पर्धा, अॅबकस, कॉम्प्युटर ऑलिम्पियाड, मंथन, स्कॉलरशिप परीक्षा, क्रीडा स्पर्धा, कराटे, नृत्य, हस्तकला, धनुर्विद्या आणि रोबोटिक्स यांसारख्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना योग्य दिशा मिळाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
बदलत्या काळाची गरज ओळखून त्यांनी इंग्रजी माध्यमातील वाणिज्य शाखा सुरू करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये आणि त्यांना आपल्या परिसरातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा त्यामागील मुख्य उद्देश होता. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली.
शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर संस्थेने सातत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दहावीच्या सलग सात वर्षांच्या शंभर टक्के निकालाची परंपरा आणि बारावी वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल ही संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष देणारी अभिमानास्पद कामगिरी आहे.
संध्या मॅडम यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संवाद. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि पालकांशी सातत्याने संपर्क ठेवणे ही त्यांची कार्यशैली आजही कायम आहे. शिक्षकांनी काळानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवावे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, यासाठी त्या नेहमी प्रोत्साहन देतात.
शिक्षणासोबत संस्कारांची जोड देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. संस्कार वर्ग, जीवनमूल्यांवर आधारित उपक्रम, सामाजिक जाणीवा निर्माण करणारे कार्यक्रम आणि अध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन यांमधून त्या विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, जबाबदारी आणि संवेदनशीलता रुजविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते शिक्षणाचा खरा उद्देश केवळ करिअर घडविणे नसून एक चांगला आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे.
व्यवस्थापकीय संचालिका म्हणून जबाबदारी सांभाळताना त्या एक आदर्श आई, पत्नी, मुलगी, बहीण आणि समाजसेविका म्हणूनही आपली प्रत्येक भूमिका तितक्याच निष्ठेने पार पाडतात. महिलांनी आत्मनिर्भर बनून समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, हा त्यांचा विचार त्यांच्या कार्यातून सतत दिसून येतो.
त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे संस्थेला महाराष्ट्र शासनाचा “माझी शाळा सुंदर शाळा” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हे पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान असला तरी त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांचे यश आणि पालकांचा विश्वास हेच सर्वात मोठे पुरस्कार आहेत.
त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामागे कुटुंबीयांचे संस्कार, आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यांचेही मोठे योगदान आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला आदर्श आणि समाजासाठी दिलेले योगदान निश्चितच अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आदरणीय सौ. संध्या विकास गायकवाड मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा..!
संकलन : महेंद्र कातुरे
परिवेक्षक
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी











