
फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदा २ एप्रिल रोजी साजरा होणार होता. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या दु:खद घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशीलता आणि आदर व्यक्त करत आमदार सचिन पाटील यांनी यंदाचा वाढदिवस कोणत्याही प्रकारच्या उत्सव, कार्यक्रम किंवा सार्वजनिक साजरीकरणाशिवाय साधेपणानेही न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी सांगितले की, अजितदादा पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी आणि लोकाभिमुख नेतृत्व होते. त्यांच्या निधनामुळे पक्षासह सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान आणि स्मृतीप्रित्यर्थ आमदार सचिन पाटील यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, कार्यकर्त्यांनीही कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या आमदार सचिन पाटील हे कौटुंबिक कारणास्तव बाहेरगावी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.








