फलटण : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा आदर्श फलटण शहरातील सोमवार पेठ येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने घालून दिला आहे. फिरंगाई देवी मंदिर परिसरातील एका छोट्या गल्लीत कार्यरत असलेल्या या मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाची स्थापना होऊन यंदा नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे परिसरातील लहान मुले व किशोरवयीन मुलांनी एकत्र येत गणेशोत्सवाची परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने आकर्षक श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत तपासणीचे आयोजन केल्याने मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय असून, लहान व किशोरवयीन मुलांनी पुढाकार घेऊन आरोग्य, सामाजिक सेवा आणि जनजागृतीसारखे उपक्रम राबविणे ही सकारात्मक बाब आहे. भविष्यातही मंडळाने अशाच प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत परिसरातील नागरिकांनी विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमात आदिराज कांबळे, रुपेश खुडे, प्रथमेश आवळे, समीर शेख, आदर्श भोंडवे, राज आडके, रोहित शिंदे, ओम आवळे, प्रशांत अहिवळे, कार्तिक लांडगे, गणेश लांडगे, रियान शेख आणि सिद्धार्थ खंडागळे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
सोमवार पेठेतील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम; एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
By Team LBNN
On: September 16, 2026 2:48 PM












